शिक्षणसंस्थांमधील अनुचित प्रकार टाळण्यासाठी दक्षिण मुंबईत पोलिसांचा उपक्रम
शैक्षणिक संस्थांमध्ये कुठलेही गैरप्रकार होऊ नये तसेच घडणाऱ्या सर्व घटनांची माहिती त्वरित उपलब्ध व्हावी, यासाठी दक्षिण मुंबईत ‘वन कॉप वन स्कूल, वन ऑफिसर वन कॉलेज’ ही अभिनव योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेनुसार, प्रत्येक पोलीस कर्मचाऱ्यावर एका शाळेची वा महाविद्यालयाची जबाबदारी सोपवण्यात येणार आहे. या कर्मचाऱ्यांना शाळा महाविद्यालयातील सर्व घटनांचा लेखाजोखा ठेवणे बंधनकारक करण्यात आले आहे.
नुकताच यवतमाळमध्ये शाळेमध्ये विद्यार्थिनींच्या लैंगिक शोषणाचा प्रकार दडपून ठेवल्याने पालकांच्या संतापाचा कडेलोट झाला होता. अनेकदा शाळा-महाविद्यालये घडलेले अनुचित प्रकार दडवून ठेवण्याचा प्रयत्न करतात, तर कधी पोलिसी सोपस्कारांच्या भीतीने पोलीस ठाण्यात जाणे टाळतात. अशावेळी त्यांच्या हक्काचा एक पोलीस त्यांच्या मदतीला असावा, या विचारातून ‘वन कॉप वन स्कूल’, ‘वन ऑफिसर वन कॉलेज’ ही योजना दक्षिण मुंबईत राबविण्यात येत आहे. दक्षिण मुंबईतील सर्व शाळा आणि महाविद्यालये या योजनेत सामावून घेण्यात आली आहेत.
‘शैक्षणिक संस्थांमध्ये पोलिसांविषयी काहीशी भीती किंवा बुजलेपण असते. त्यामुळे अनेकदा घडलेल्या घटनांची माहिती पोलिसांना देण्याचे टाळले जाते. त्यामुळे शैक्षणिक संस्था आणि मुंबई पोलीस यांच्यात एक दुवा निर्माण व्हावा म्हणून ही योजना जुलैपासून राबविण्यात येत आहे,’ असे दक्षिण प्रादेशिक विभागाचे अतिरिक्त आयुक्त प्रताप दिघावकर यांनी सांगितले.
शाळा अथवा महाविद्यालय नेमून दिलेल्या पोलिसाने आठवडय़ातून एकदा त्या शैक्षणिक संस्थेमध्ये जाऊन प्राचार्य/मुख्याध्यापक यांची भेट घेऊन अडचण, समस्या आहेत का, याची माहिती घ्यावी. काही सूचना असतील तर कराव्यात असे अपेक्षित आहे. तसेच सर्व शैक्षणिक संस्थांना जवळचे पोलीस ठाणे, तेथील अधिकारी यांचे भ्रमणध्वनी क्रमांक दर्शनी भागात लावण्याची विनंतीही आम्ही केली असून या माध्यमातून तरुणींना छेडछाड झाल्यास त्याची माहिती तातडीने पोलिसांना कळविणे शक्य होईल.