बंदोबस्तावरील कर्मचाऱ्यांना दाम्पत्याकडून चहा, पराठा वाटप; तपासणी अहवाल आणण्यापासून रुग्णालयात नेईपर्यंत सहकाऱ्याची सोबत

मुंबई : करोनावर मात करून घरी परतलेल्या रुग्णासह त्याच्या कुटुंबावर बहिष्कार घालणे, डॉक्टर, परिचारिका, पोलिसांना इमारतीत राहू न देणे अशा घटना दाखवणाऱ्या करोनाकाळात माणसाविषयी, माणुसकीविषयीचा विश्वास दृढ करणाऱ्या घटनाही घडत आहेत. नागरिक आणि करोना यांच्यादरम्यान भिंत बनून उभ्या राहिलेल्या पोलिसांना अशा माणुसकीचा अनुभव अनेकदा आला आहे.

चेंबूर परिसरात राहाणाऱ्या डिसुझा दाम्पत्याला पूर्व उपनगरांतील विशेषत: चेंबूर, गोवंडी, मानखुर्द भागातील पोलीस कधीच विसरू शकणार नाहीत. रॉस्मंड डिसुजा अभियंता आहेत. त्यांच्या पत्नी स्वीटी गृहिणी. टाळेबंदीतच्या सुरुवातीच्या काळात जीवनावश्यक वस्तू खरेदी करण्यासाठी कारने बाहेर पडलेल्या रॉस्मंड यांना नाकाबंदी, बंदोबस्तावर तैनात पोलीस जागोजागी आढळले. या पोलिसांसाठी काही तरी करावे, हा विचार घेऊन रॉस्मंड घरी परतले. तेव्हापासून आजपर्यंत हे दाम्पत्य रोज दहा लिटर दुधाचा चहा आणि ७० ते ८० जणांना पुरतील इतके  पराठे घरी तयार करून कारने बाहेर पडते. चेंबूर, गोवंडी, शिवाजीनगर, मानखुर्द, धारावी, अ‍ॅन्टॉप हिल, शीवपर्यंत फिरून रस्त्यांवर तैनात पोलिसांना चहा, पराठा देऊ करते. सुरुवातीला घराजवळच्याच तीन ते चार भागांत चहा, नाश्ता देत होते. मात्र त्यातून मिळणारे समाधान अनुभवल्यानंतर डिसुजा यांनी चहा, नाश्त्याचे प्रमाण वाढवले आणि फिरण्याचा परीघही. निसर्ग चक्रीवादळाचा इशारा होता त्यादिवशी दाम्पत्याने दुपारऐवजी सकाळीच फेरी काढली. भर पावसातही हे दाम्पत्य गरमागरम चहा, पराठे घेऊन हजर होते.काही वेळा पोलिसांनीही चौकट ओलांडून आदर्श निर्माण के ला. जेजे मार्ग पोलीस ठाण्यातले शिपाई गौतम चव्हाण त्यातलेच. करोना काळात त्यांनी तीन हजारांहून अधिक पोलीस आणि त्यांच्या कु टुंबीयांना मोलाचे सहकार्य के ले. लक्षण दिसताच शहराच्या प्रत्येक भागातील पोलीस जेजे रुग्णालयात चाचणीसाठी येऊ लागले. त्यांना चाचणी कक्षात नेणे, चाचणी करून घेणे, अहवालासाठी डॉक्टरांसोबत पाठपुरावा करणे आणि वरिष्ठांकरवी संबंधित पोलिसांपर्यंत अहवाल पोहोचवणे ही मोलाची मदत चव्हाण यांनी के ली. पोलीस करोनाबाधित आढळल्यावर त्यांच्या संपर्कात आलेले सहकारी, कु टुंबीयांनाही चव्हाण त्याच हिरीरीने, उत्साहाने मदत करू लागले. काही पोलिसांना, त्यांच्या कु टुंबीयांना रुग्णालयात दाखल करेपर्यंत चव्हाण यांनी मदत के ली. आजवर त्यांनी तीनवेळा चाचणी करून घेतली. मात्र करोना त्यांना शिवू शकलेला नाही. जीव धोक्यात घालून चव्हाण यांनी के लेले कर्तव्य प्रेरणादायी आहे, असे स्पष्ट करत दक्षिण विभागाचे अतिरिक्त आयुक्त निशित मिश्र यांनी चव्हाण यांचा प्रशस्तीपत्र देऊन सन्मान के ला.

खाकी वर्दीतील दातृत्व

* सशस्त्र विभागात कार्यरत महिला पोलीस शिपाई रेहाना शेख यांनी करोनाकाळात पनवेलच्या आश्रमशाळेतले ५० विद्यार्थी दत्तक घेतले. या विद्यार्थ्यांचा संपूर्ण शैक्षणिक खर्च शेख करणार आहेत.

* करोनाच्या सुरुवातीच्या काळात बाजारात मुखपट्टय़ांचा तुटवडा होता. तेव्हा पोलीस नाईक प्रभाकर देवकर यांनी मुखपट्टय़ा बनवून घेतल्या आणि त्या पोलीस दलात वाटल्या. त्यानंतर त्यांनी सुमारे चार लाख मुखपट्टय़ा पोलीस दलाला उपलब्ध करून दिल्या.

*  रुग्णवाहिका मिळत नसल्याने गरोदर महिलेचे हाल पाहून हेलावलेल्या पोलीस शिपाई तेजस सोनवणे यांनी स्वखर्चातून रुग्णांना रुग्णालयात सोडण्यासाठी विशेष वाहन तयार के ले. आतापर्यंत १९ रुग्णांना त्यांनी या वाहनाने रुग्णालयात दाखल के ले.

नवजात बालकाला जीवदान

पावसात धोबी तलाव येथे रस्त्यावरच प्रसूत झालेली गतिमंद महिला आणि तिच्या नवजात बाळाचा जीव आझाद मैदान पोलीस ठाण्यातील उपनिरीक्षक प्रिया गरुड आणि पथकाने वाचवला. गरुड, शिपाई अस्मिता जाधव आणि पाटील हे पथक घटनास्थळी पोहोचले तेव्हा महिला प्रसूत झाली होती. मात्र बाळासोबत जोडलेली नाळ अर्धवट बाहेर आल्याने परिस्थिती नाजूक होती. या पथकाने रुग्णवाहिका,

डॉक्टर येईपर्यंत चार तास महिला, तिच्या बाळाचे संरक्षण के ले. सकाळी सातच्या सुमारास बाळ-बाळंतिणीला रुग्णालयात दाखल करूनच हे पथक माघारी फिरले.