गुन्हे शाखेकडून संघटित टोळ्यांशी संबंधित प्रत्येकाची चौकशी सुरू

जयेश शिरसाट, मुंबई</strong>

संघटित गुन्हेगारी टोळ्यांमधील गुन्हेगार खास करून १९८०च्या दशकापासून अभिलेखावर संघटित टोळीचा सदस्य म्हणून नोंद असलेल्या प्रत्येकाची मुंबई गुन्हे शाखेने चौकशी सुरू केली आहे. एके काळी संघटित गुन्ह्य़ात आघाडीवर असलेल्यांचे नवे ‘धंदे’ शोधून काढण्याच्या उद्देशाने प्रत्येक व्यक्तीबाबतचे सर्व तपशील नोंद होत असून ते टप्प्याटप्प्याने पडताळले जाणार आहेत.

पोलीस आयुक्त संजय बर्वे, तत्कालीन सहआयुक्त आशुतोष डुंबरे यांच्या सूचनेनुसार गुन्हे शाखेच्या विविध कक्षांनी आपापल्या हद्दीतील संघटित टोळ्यांशी संबंधित गुंडांची यादी तयार केली. संघटित टोळ्यांना चाप लावण्यासाठी १९९९ मध्ये महाराष्ट्र शासनाने संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा (मोक्का) आणला. या कायद्यानुसार अटक केलेल्या सर्वच गुंडांचा यादीत समावेश आहे. त्यापूर्वीच्या काळात टोळ्यांशी संबंधित गुंडांची नावे दाखल गुन्हय़ांच्या नोंदींवरून यादीत जोडली जात आहेत.

गुन्हे शाखेच्या १२ कक्षांसह खंडणीविरोधी पथकाकडे यादीनुसार गुंडांची चौकशी सुरू आहे. किती गुन्हे दाखल आहेत, खटले सुरू आहेत का, जामिनावर बाहेर आल्यानंतर उदरनिर्वाहासाठीचा व्यवसाय किंवा धंदा, निवासाचा पत्ता, संपर्क क्रमांक, मोक्काव्यतिरिक्त अन्य गुन्हे दाखल आहेत का? कोणत्या राजकीय पक्षाचा आश्रय आहे का? ही माहिती या चौकशीतून नोंद केली जात आहे. यादीतील दक्षिण मुंबईतील किंवा महत्त्वाच्या गुन्हय़ांमध्ये सहभागी गुंडांची चौकशी खंडणीविरोधी पथकाकडून सुरू आहे.

गुन्हे शाखेशी संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार लोकसभा निवडणुकीचे मतदान मोकळ्या वातावरणात पार पडावे, संघटित टोळ्यांशी संबंधित सर्वच गुंडांमध्ये त्यांच्यावर लक्ष आहे हा संदेश जावा, धाक राहावा आणि पडद्याआड किंवा गुप्तपणे सुरू असलेल्या गुन्हेगारी कारवायांची माहिती उपलब्ध व्हावी, या उद्देशाने ही मोहीम हाती घेण्यात आली आहे. गुंडांनी चौकशीत दिलेले तपशील पडताळले जात आहेत. निवडणुकीत अशा गुंडांना हाताशी धरून मतदारांवर दबाव आणला जातो, प्रभावित केले जाते. त्याशिवाय बांधकाम व्यावसायिकांकडे त्या त्या भागातले गुंड खंडणीऐवजी माथाडीसह या क्षेत्रातील विविध कामांची मागणी करतात. त्यासाठी दबाव आणतात. विविध शासकीय प्रकल्पांमधली कंत्राटे गुंडांकडे आहेत. अनेक गुंडांनी राजकीय पक्षांमध्ये प्रवेश करत पदे पटकावली आहेत. त्यांच्याकडून अप्रत्यक्षरीत्या गुन्हेगारी सुरू आहे. ती मोडून काढणे हाही यामागील प्रमुख हेतू असल्याचे या अधिकाऱ्याने स्पष्ट केले.

प्रदीप सावंत यांच्यावर जबाबदारी

शहरात संघटित गुन्हेगारी टोळ्यांना चाप लावण्यात महत्त्वाचे योगदान देणारे गुन्हे शाखेचे तत्कालीन उपायुक्त प्रदीप सावंत यांच्या देखरेखीखाली हा उपक्रम सुरू आहे. सावंत सध्या सुरक्षा-संरक्षण विभागात नेमणुकीस असून त्यांची विशिष्ट उद्देशाने या उपक्रमासाठी निवड केल्याचे सांगण्यात आले. मोक्काचा पहिला गुन्हा सावंत यांनीच नोंदवला. एकीकडे चकमक आणि दुसरीकडे मोक्कासारख्या कठोर कायद्याचा वापर करून त्यांच्या आधिपत्याखालील गुन्हे शाखेने संघटित गुन्हेगारी टोळ्यांचे कंबरडे मोडले. त्यामुळे संघटित गुन्हेगारी टोळ्यांवर त्यांचा दरारा होता. त्याच दराऱ्याचा उपयोग या उपक्रमाला होणार आहे, असे वरिष्ठ अधिकाऱ्याने स्पष्ट केले.