पोलिसांनी मृत शीना बोराचे पारपत्र डेहराडून येथून ताब्यात घेतले असून त्यात शीना अमेरिकेला गेल्याचा कुठलाही उल्लेख आढळून आलेला नाही. त्यामुळे शीना अमेरिकेला गेल्याचा इंद्राणीने केलेला दावा खोटा ठरला आहे. या प्रकरणातला हा एक मोठा पुरावा मानला जात आहे.
शीना अमेरिकेत असल्याचा दावा इंद्राणी मुखर्जी करत होती. परंतु शुक्रवारी पोलिसांनी डेहराडून येथून शीनाचे पारपत्र मिळवले. त्यात ती अमेरिकेला गेल्याचा उल्लेख नव्हता. त्यामुळे शीना खोटे बोलत असल्याचे उघड झाल्याचे पोलीस आयुक्त राकेश मारिया यांनी सांगितले. दरम्यान, संजीव खन्ना यानेही गुन्ह्यातील सहभागाची कबुली दिली असून त्याच्या सहभागाचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. शीनाचा भाऊ मिखाईलने पोलिसांना दिलेल्या महत्वपूर्ण माहितीचा तपासासाठी उपयोग झाला. या प्रकरणाच्या तपासासाठी पोलिसांनी पथके देशाच्या विविधा भागात गेल्याचे मारिया म्हणाले. शीनाच्या सांगाडय़ाचे अवशेष न्यायवैद्यक प्रयोगशाळेत जुळवून वैद्यकीय पुरावे मिळवले जाणार आहेत. तिन्ही आरोपींना समोरासमोर करून विशिष्ट प्रश्नांचा एकत्रित मारा करण्याची पोलिसांची योजना होती. खुद्द मारियांनी प्रश्नांची सरबत्ती केल्याने आरोपींची भंबेरी उडाली होती.