करोनाचा प्रकोप पाहता आरोग्य यंत्रणेसोबत पोलिसांवरचा ताणही वाढू लागला आहे. गर्दी टाळण्यासाठी पोलिसांना बंदोबस्तावर राहावं लागत आहे. राज्यात करोनाचा प्रादुर्भाव मार्च २०२० मध्ये सुरू झाला होता. नागरिकांनी विनाकारण रस्त्यावर फिरू नये यासाठी पोलिसांकडून संपूर्ण राज्यात बंदोबस्त ठेवण्यात आला होता. आताही तशीच स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे पोलीस यंत्रणेवरील ताण वाढू लागला आहे. बंदोबस्तावर असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांबरोबरच त्यांच्या कुटुंबीयांनीही करोनाची लागण होण्याची भीती असते. अशा अनेक घटना घडल्या आहेत. त्यामुळे पोलिसांनी मास्क घालण्याचं आवाहन ट्विटरच्या माध्यमातून केलं आहे. इतकंच नाही माँ हा शब्द किती महत्त्वाचा आहे हे पटवून दिलं आहे. मास्क आपलं करोनापासून रक्षण करेल असा संदेश देण्यात आला आहे.

दूसरीकडे सार्वजनिक ठिकाणी थुंकल्याने करोनासह इतर आजाराचांही फैलाव होतो. त्यामुळे जागरूक व्हा, जबाबदार व्हा असं आवाहन पोलिसांनी केलं आहे. तसेच सार्वजनिक ठिकाणी थुंकणाऱ्या व्यक्तीवर कलम ११७, महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९६० अंतर्गत कठोर कारवाईचे आदेश देण्यात आले आहेत.

राज्यात काही दिवसांपासून करोना महासाथीची दुसरी लाट आली असून दररोज बाधितांचा आकडा वाढत आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी सर्व विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त, पोलीस अधीक्षक, जिल्हा शासकीय रुग्णालयाचे सिव्हिल सर्जन, जिल्हा तसेच राज्य कृती दलाचे सदस्य, वैद्यकीय महाविद्यालयांचे अधिष्ठाता यांच्याशी संवाद साधून कडक निर्बंध लादण्याच्या सूचना दिल्या आहेत.