राज ठाकरे यांच्या नेतृत्त्वाखाली महाराष्ट्र नवनिर्माण सेना बुधवारी राज्यभरात करणाऱया रास्ता रोको आंदोलनाची तीव्रता रोखण्यासाठी पोलीसांनी प्रतिबंधात्मक उपाययोजना सुरू केली आहे. राज ठाकरे यांच्यासह राज्यातील पक्षाच्या पदाधिकाऱयांना फौजदारी दंड संहितेतील कलम १४९ नुसार प्रतिबंधात्मक नोटीस बजावण्यात आली आहे.

शिवाजी पार्क पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक परशुराम काकड यांनी मंगळवारी सकाळी राज ठाकरे यांच्या ‘कृष्णकुंज’ या निवासस्थानी जाऊन त्यांना नोटीस दिली. मुंबईमध्ये २१ फेब्रुवारीपर्यंत जमावबंदीचे आदेश लागू करण्यात आले आहेत. त्यामुळे मोर्चा, निदर्शने करण्यास मनाई आहे. या पार्श्वभूमीवर मनसेने शिवाजी पार्क हद्दीत आणि इतरत्र कुठेही जमून रास्ता रोको करू नये, असे नोटिसीमध्ये लिहिण्यात आले आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान होऊ नये, याचीही जबाबदारी राज ठाकरे यांच्यावर असून, तसे न केल्यास कायदेशीर कारवाई करण्याचा इशाराही नोटिशीत देण्यात आला आहे.
मनसेच्या राज्यातील विविध पदाधिकाऱयांना याच कलमाखाली नोटीस बजावण्यात आली आहे. दरम्यान, या नोटिसीनंतरही मनसेतर्फे बुधवारी रास्ता रोको करण्यात येणार असल्याचे पक्षाच्या पदाधिकाऱयांनी स्पष्ट केले.