जीवनावश्यक वस्तूंचा बहाणा; विनाकारण फिरणाऱ्यांचा पोलिसांना त्रास

मुंबई : देशभरात टाळेबंदी सुरू असली तरी मुंबईत मात्र बिनकामाचे रस्त्यांवर फिरणाऱ्यांचा त्रास कमी झालेला नाही. जीवनावश्यक वस्तू, औषधे आणायची आहेत, डॉक्टरांकडे जायचे आहे अशी विविध कारणे पोलिसांना देत नागरिकांचा स्वैर वावर सुरू आहे.

महत्त्वाचे मोठे रस्ते सोडले तर गल्लीबोळ्यांमधील वस्त्यांमध्ये दैनंदिन व्यवहार नेहमीप्रमाणे सुरू आहेत. किराणा, औषधालये, एटीएएम वगळता इतर व्यवसाय, दुकाने बंद असली तरी रस्त्यांवर फिरणाऱ्यांचा या भागात कमी नाही. लोक वारंवार जीवनावश्यक वस्तूंच्या खरेदीकरिता बाहेर पडत आहेत. पायी फिरण्याबरोबरच दुचाकी आणि चारचाकी घेऊन जाणारेही मोठय़ा संख्येने आहेत. अनेकजण पोलिसांची नजर चुकवून पळ काढतात. पण जे पोलिसांच्या तावडीत सापडतात, ते असंख्य कारणे देत सुटका करून घेतात. डॉक्टरांकडे जायचे आहे, औषध आणायला निघालो आहे अशी नाना कारणे पुढे करत असल्याची माहिती पोलिसांनी दिली. काही पोलिसांनी अडवू नये म्हणून दवाखान्याचे कागदपत्र सोबत घेऊन फिरतात. यातले कित्येक जण विनाकारण रस्त्यांवर फिरण्याकरिता बाहेर पडलेले असतात. परंतु वैद्यकीय कागदपत्रे सोबत असल्याने पोलिसांचेही हात बांधले जात असल्याचे एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले. त्यात गरजूंना अन्नदान किंवा जीवनावश्यक वस्तू पुरविण्याकरिता अनेक संस्था पुढे सरसावल्या आहेत. अशा संस्थांसोबतही अनावश्यक लोकही गर्दी करतात. सामाजिक अंतराची एैशीतैशी होत असल्याचे निरीक्षण पोलिसांना वर्तवले. चार माणसांची गरज असते तिथे दहा ते पंधरा लोक जेवण वाटत असतात. शीव, माटुंगा, दादर, चेंबूर, कुर्ला, परळ येथील पोलिसांना अशा मंडळींकडून मोठा त्रास होत आहे. विशेषत: तरुण मोठय़ा संख्येने असतात.

नियमांचे पालन नागरिकांच्याच हातात 

‘ज्यावेळी लोक अत्यावश्यक सेवेचे कारण देतात तेव्हा आम्हीही हतबल होतो. लोकांना बाहेर पडायची मेख कळलेली आहे. त्यामुळे देशाची परिस्थिती लक्षात घेऊन नियमांचे पालन करणे केवळ नागरिकांच्या हातात आहे, जबाबदारीचे भान बाळगून ते घरात राहिले तर पोलीस प्रशासनाला सहकार्य होईल.’ अशी भावना नाकाबंदीत तैनात असलेल्या पोलिसांनी व्यक्ती केली.