मुंबई पोलिसांची एक टीम गँगस्टर रवी पुजारीला बंगळुरूवरून घेऊन मुंबईत दाखल झाली आहे. मुंबई गुन्हे शाखेचे सह पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे यांनी ही माहिती दिली आहे. रवी पुजारीला आज मुंबई सत्र न्यायालयासमोर गजाली रेस्टॉरंटमधील गोळीबार प्रकरणी हजर करण्यात आलं. आता त्याला ९ मार्च पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

गँगस्टर रवी पुजारीवर खून आणि खंडणीसह गंभीर गुन्हे केल्याचा आरोप आहे. २२ फेब्रुवारी रोजी त्याचे सेनेगल येथून प्रत्यार्पण करण्यात आले. कर्नाटकमधील एका न्यायालयाच्या मंजुरीनंतर मुंबई पोलिसांची एक टीम गँगस्टर रवी पुजाराला ताब्यात घेण्यासाठी सोमवारी बंगळुरुमध्ये पोहचली होती. त्याला कर्नाटकमधील एका तुरूंगात ठेवण्यात आलं होतं. या अगोदर तो अनेक वर्षांपासून फरार होता.

अंधेरीच्या रस्त्यावरुन भाईगिरी सुरु करणारा रवी पुजारी बनला अंडवर्ल्ड डॉन

९० च्या दशकातील कुख्यात गँगस्टर रवी पुजारीला आफ्रिका खंडातील सेनेगल या देशामध्ये अटक झाली होती, त्यांनतर त्याला भारतात आणण्यासाठी कर्नाटक पोलिसांची विशेष टीम आणि ‘रॉ’ चे पथक सेनेगलमध्ये तळ ठोकून होते.