पाच हजार रुपये खर्च करा, संतती जन्माला घालतो, अशी बतावणी करणाऱ्या  मेलवेल मन्नील्यम अर्जन ऊर्फ वीरप्पन बाबा या भोंदूबाबाला चित्ता कॅम्प, मुंबई येथून कामोठे पोलिसांनी अटक केली आहे. पीडित महिलेचा विनयभंग  व अंधश्रद्धा निर्मूलन कायद्याचा भंग केल्याप्रकरणी या भोंदूबाबाला अटक केली आहे.
    पीडित महिलेला तिचे सासू-सासरे दोन वर्षांपूर्वी वीरप्पनकडे मुलगा होण्याच्या विधीसाठी घेऊन गेले होते. विधी झाले तरीही मुलगा होत नव्हता, मात्र वेळोवेळी पीडितेला वीरप्पन बाबा संतती होण्यासाठी फोनवर संपर्क साधून आपल्यासमवेत संबंध प्रस्थापित करण्यासाठी तगादा लावत होता.
 अखेरीस पीडितेने सासू-सासऱ्यांविरोधात जाच व छळ केल्याची तक्रार पोलीस ठाण्यात दाखल केली . तिचे सासू-सासरे फरारी असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. इतरांना संततीचा प्रसाद देणारा वीरप्पन पत्र्याच्या खोलीत राहत असल्याचे पोलिसांना अटक करताना आढळले. सध्या हा भोंदूबाबा १९ फेब्रुवारीपर्यंत चौकशीसाठी कामोठे पोलीस ठाण्याच्या कोठडीत आहे.