दिंडोशी येथे दोन पक्षांमध्ये झालेली हाणामारी, राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांना झालेली अटक आणि सध्या सुरू असलेल्या विधानसभा अधिवेशनामुळे कायदा व सुव्यवस्था बिघडू नये यासाठी मुंबईत जमावबंदी लागू करण्यात आली आहे. रविवार, १३ मार्चपासून २७, मार्चपर्यंत ही जमावबंदी लागू राहणार आहे. या आदेशानुसार पाच किंवा अधिक नागरिकांना एकत्र जमण्यास बंदी असणार आहे.
दिंडोशी येथे शनिवारी रात्री मनसे आणि भाजप कार्यकर्त्यांदरम्यान हाणामारीचे प्रसंग घडले. रविवारीही त्याची पुनरावृत्ती झाली. सध्या विधानसभेचे अर्थसंकल्पीय अधिवेशनही सुरू असून त्यामुळे अनेक संघटना मोर्चे घेऊन आझाद मैदानावर थडकत आहेत. त्यातच, सोमवारी सक्तवसुली संचालनायाने मनी लाँड्रींगच्या आरोपात राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांची चौकशी करून त्यांना अटक केली. त्या वेळीही पक्षाच्या कार्यकर्त्यांनी शक्तीप्रदर्शनाचा प्रयत्न केला.
या पाश्र्वभूमीवर, शहरात कायदा व सुव्यवस्था बिघडू नये यासाठी मुंबई पोलिसांनी रविवार, १३ मार्चपासून पुढील १५ दिवसांसाठी शहरात जमावबंदीचे आदेश लागू केले आहेत. या आदेशामुळे, शहरात समारंभ आणि पूर्वपरवानगीशिवाय पाच किंवा त्यापेक्षा अधिक व्यक्तींना एकत्र येण्यावर बंदी असणार आहे.
याबाबतचे आदेश पोलीस सहआयुक्त (कायदा व सुव्यवस्था) देवेन भारती यांनी जारी केले असून सर्व पोलीस ठाण्यांना त्याची काटेकोर अंमलबजावणी करण्याचे आदेशही दिले आहेत.