तृतीयपंथीयाकडून २५ हजारांची लाच घेताना एका पोलीस निरीक्षकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने (एसीबी) रंगेहाथ पकडले आहे. दीपक हरिभाऊ खरात (४८) असं आरोपी पोलिसांचं नाव आहे. दीपक हा सहाय्यक पोलीस निरीक्षक म्हणून मुंबईतील गोवंडी पोलीस ठाण्यात कार्यरत असताना ही कारवाई करण्यात आली. तृतीयपंथीयाकडून लाच घेताना पोलिसाला एसीबीने रंगेहाथ पकडण्याची ही पहिलीच वेळ असण्याची शक्यता आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, गुन्ह्यामध्ये भावाला अटक न करण्यासाठी आरोपी पोलिसाने तक्रारकर्त्याकडे ५० हजार रुपयांची लाच मागितली होती. पैसे न दिल्यास भावाला अटक करण्याची धमकी देण्यात आली. त्यानंतर तक्रारकर्त्या तृतीयपंथीयाने एसीबीशी संपर्क साधला आणि तक्रार केली. त्यानंतर एसीबी अधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार तक्रारकर्त्या तृतीयपंथीयाने आरोपीशी संपर्क साधून पैसे देण्याची तयारी दर्शवली पण ५० हजार देऊ शकत नसल्याचं सांगितलं आणि अखेरीस 25 हजार रुपये देण्याचे ठरले होते. अखेर सोमवारी एसीबीच्या पथकाने गोवंडी पोलीस ठाण्यात सापळा रचून आरोपीला रंगेहाथ अटक केली.

तक्रारदाराच्या मामेभावावर दुखापतीचा गुन्हा गोवंडी पोलीस ठाण्यात दाखल आहे. या गुन्ह्याचा तपास दिपक खरात हे करत होते. तक्ररारदार यांचा भाऊ सध्या जामीनावर असून त्याच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई न करण्यासाठी खरात याने तृतीयपंथीयाकडे ५० हजार रुपयांची लाच मागितल्याचं समोर आलं आहे. आरोपी खरात विरोधात लाचलुचपत प्रतिबंधक कायद्यानुसार गोवंडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.