राजू परुळेकर

गणेशोत्सव अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. हा सण शांततेत आणि उत्साहाच्या वातावरणात पार पडावा म्हणून मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीतील भायखळा आणि आग्रीपाडा परिसरातील दोन्ही पोलीस ठाण्यांनी यंदा नवा उपक्रम हाती घेऊन गणेशोत्सव मंडळांना काही सूचना केल्या आहेत. सहाय्यक पोलीस आयुक्त दिलीप शिंदे, भायखळा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिनेश कदम आणि आग्रीपाडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक आगवणे यांच्या या नव्या सूचनांचे गणेशोत्सव मंडळांनीही स्वागत केले आहे.

भायखळा पोलीस ठाण्याच्या हद्दीत ४३ सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे आहेत. तर आग्रीपाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत ५० मंडळे आहेत. या दोन्ही पोलीस ठाण्याचे वरिष्ठ अधिकारी व सहाय्यक पोलीस आयुक्त दिलीप शिंदे यांच्या संकल्पनेतून साकारला जाणारा उपक्रम हा खऱ्या अर्थाने जनता आणि पोलीसांमध्ये समन्वय घडविणारा आहे. आग्रीपाडा आणि भायखळा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील तब्बल ९३ गणेशोत्सव मंडळांना पोलिसांनी एक पत्रक पाठवून काही सूचना केल्या आहेत. पोलिसांनी दिलेल्या पत्रकात गणेशोत्सव मंडळांना मंडपात दोन सीसीटीव्ही कॅमेरे लावावे. त्यामुळे उत्सवाला गालबोट लावणाऱ्यांवर वचक निर्माण होऊ शकेल, असे म्हटले आहे.

यापूर्वी गणेश मंडळाच्या मंडपात विरंगुळा म्हणून पत्त्यांचा जुगार खेळला जायचा. आता तो बंद करून त्याऐवजी मंडपात कॅरम, बुद्धिबळ यासारख्या स्पर्धांचे आयोजन करावे. त्यामुळे जुगाराचा नाद सुटेल आणि बुद्धीजीवी जुन्या खेळाची परंपरा सुरु होईल, त्यात मंडळाचे सूज्ञ नागरिकही येऊन सहभागी होतील, असे या पत्रकात म्हटले आहे.

दिवसा कामात आणि रात्री सोशल मीडियवर रमणाऱ्या तरुणाईच्या हातात कॅरमचा स्ट्रायकर द्यावा, डोक्याला चालना देणाऱ्या बुद्धिबळाची सोंगटी द्यावी तरच ते आभासी जगाच्या विळख्यातून बाहेर पडू शकतील, हा गणेशोत्सवाचा उद्देश असावा, असे पोलिसांनी म्हटले आहे.

गणेशोत्सवात जातीय सलोखा निर्माण व्हावा यासाठी अन्य धर्मीयांनाही गणेशोत्सवात सामील करुन घ्यावे, त्यांच्याकडेही एखादी जबाबदारी सोपवावी, ज्येष्ठांचा सत्कार करावा, असेही पोलिसांनी म्हटले आहे. या सर्व सूचनांचे पालन केल्यास तुमचं मंडळ आदर्श मंडळ ठरेल. परिसरातील महिला वर्गही मंडळाची आदर्शवत कामगिरी पाहून मंडळाच्या मदतीला येईल आणि खऱ्या अर्थाने तो सार्वजनिक गणेशोत्सव ठरेल, असे पोलिसांनी म्हटले आहे.