शहरातल्या शहरातला मुक्तसंचार खुंटला; वाहनजप्ती, वाहनकोंडीचा मनस्ताप

मुंबई : पोलिसांनी सोमवारी मुंबईच्या पाच प्रवेशद्वारांसह संपूर्ण शहरात २००हून अधिक ठिकाणी नाकाबंदी लावून नागरिकांचा शहरातल्या शहरातला मुक्तसंचार रोखल्याने अनेक ठिकाणी वाहनजप्ती, वाहनकोंडी अशा प्रचंड मनस्तापाला मुंबई व उपनगरवासीयांना सामोरे जावे लागले.

अत्यावश्यक सेवा, वैद्यकीय कारण आणि कार्यालयात बोलावलेल्या मर्यादित सरकारी, खासगी अधिकारी कर्मचाऱ्यांच्या वाहनांव्यतिरिक्त अन्य सर्व वाहने जप्त करण्यात आली. त्या वाहनांमधून प्रवास करणाऱ्या विरोधात गुन्हे नोंदवण्यात आले. सोमवारी पहाटेपासून शहरातल्या ९४ पोलीस ठाण्यांनी आपापसात समन्वय करून हद्दीतल्या दोन ते तीन ठिकाणी नाकाबंदी सुरू केली. दोन उपनगरे जोडणारे मुख्य मार्ग आणि संबंधित उपनगरातील अंतर्गत मार्गावर नाकाबंदी करून पोलीस प्रत्येक वाहन चाचपत होते. यात विनाकारण म्हणजे खरेदी, नातेवाईकांची भेट आणि अन्य (नियमात न बसणाऱ्या) कारणांसाठी प्रवास करणाऱ्यांची वाहने पोलीस थेट जप्त करत होते, तर अत्यावश्यक सेवा, वैद्यकीय कारण सांगणाऱ्यांचेही तपशील पडताळले जात होते.

एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार टाळेबंदीत वाहतुकीचे नियम घालून देण्यात आले आहेत. दुचाकीवरून एक, चारचाकी वाहनांतून चालकासह तीन व्यक्ती प्रवास करू शकतात. आतापर्यंत कारवाईबाबत शिथिल असलेल्या पोलिसांनी सोमवारी नियमांचा आधार घेत मर्यादा ओलांडणाऱ्या प्रत्येक वाहनावर कारवाई के ली.

जप्त केलेली वाहने पोलीस ठाणे किंवा पोलीस ठाण्याच्या हद्दीतल्या मोकळ्या जागेत आणून उभी करण्यात आली. ही वाहने नागरिकांना न्यायालयातून सोडवून घ्यावी लागतील, असे पोलीस प्रवक्ते प्रणय अशोक यांनी स्पष्ट केले. काही ठिकाणी सौम्य गुन्हा असल्यास वाहने काही काळ जप्त करून पुन्हा चालकाच्या ताब्यात देण्यात आले. मात्र पुढल्या वेळी वाहन जप्त होईल, अशी तंबी पोलीस देत होते. गंभीर गुन्हा म्हणजे मर्यादेपेक्षा जास्त व्यक्ती, अत्यावश्यक कारण नसतानाही प्रवास आढळल्याने वाहने जप्त करत होते. पोलीस ठाण्यातल्या आवारातली जागा कमी पडली की मोकळे रस्ते, मैदाने, उड्डाणपुलाखालील मोकळी जागा आदी ठिकाणी जप्त केलेली वाहने ठेवली जात होती.

पोलीसही नाराज

या निर्बंधांच्या अंमलबजावणीमुळे अधिक ताण येईल का हा प्रश्न अनेक पोलीस ठाण्यांच्या प्रमुखांना विचारण्यात आला. काही अधिकाऱ्यांनी, पोलिसांना ताण येईल का, याचा विचार कोणीही कधीही केलेला नाही. मुळात पोलिसांना काही विचारण्याचा अधिकार नाही. आम्ही फक्त आदेशांचे पालन करतो, अशी प्रतिक्रि या दिली. तर करोनाकाळात टाळेबंदीची अंमलबजावणी ते स्थलांतरित श्रमिकांची पाठवणी या मोठय़ा, वेळखाऊ आणि जोखमीच्या जबाबदाऱ्या पोलिसांनी यशस्वीपणे हाताळल्या. या काळात घरापर्यंत करोना पोहोचला तरी पोलीस रस्त्यांवर ठामपणे उभे आहेत, असे पश्चिम उपनगरातील एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले. काहींकडून, मात्र गुन्हे, आंदोलने, पालिकेचे पाडकाम या जबाबदाऱ्या सध्या नाहीत. त्यामुळे नाकाबंदीचा विशेष ताण नाही, अशा प्रतिक्रिया मिळाल्या.

शहरातही वाहतूककोंडी

नाकाबंदीमुळे सोमवारी सकाळी शहरात अनेक ठिकाणी वाहतूक कोंडी झाली. जेजे उड्डाणपूल, दादर, सुमननागर चौक, पूर्व आणि पश्चिम द्रुतगती मार्ग या ठिकाणी वाहतूक अत्यंत मंद गतीने सुरू होती. एरव्हीही नाकाबंदीमुळे वाहनांच्या रांगा लागतात. पण सोमवारी प्रवाशांकडे चौकशी आणि पडताळणीमुळे मागील वाहने बराच काळ खोळंबून पडली. ठाणे आणि मुंबईच्या वेशीवरील आनंदनगर टोल नाक्याजवळ पोलिसांनी सोमवारी नाकाबंदी केल्याने या ठिकाणी प्रचंड वाहतूक कोंडी झाली. ठाण्यातील तीन हात नाक्यापर्यंत वाहनांच्या रांगा पोहोचल्या होत. १० मिनिटांच्या अंतरासाठी अर्धा ते पाऊण तासांचा अवधी लागत होता.

मुखपट्टीवरून पोलिसांशी संघर्ष

वाहनांसोबत पायी जाणाऱ्या, पण मुखपट्टी न लावणाऱ्यांवर पोलिसांनी कडक करवाई केली. मात्र या कारवाईदरम्यान प्रत्येक ठिकाणी नागरिक आणि पोलिसांचा संघर्ष घडला.