कुख्यात अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहीम याचे प्रभावक्षेत्र म्हणून एकेकाळी ओळखला जाणारा मुंबईतील डोंगरी परिसर आता अमली पदार्थांचा बालेकिल्ला बनू लागला आहे. येथील एका निवासी संकुलातील कारखाना उद्ध्वस्त करत अमली पदार्थ नियंत्रण विभागाच्या (एनसीबी)केंद्रीय पथकाने कालच कोट्यवधी रुपयांचे ‘एमडी’ आणि ते बनवण्यासाठी आवश्यक रसायनांचा साठा जप्त केला. कारवाईदरम्यान दोन कोटी रुपयांची बेहिशोबी रोकड आणि अद्ययावत शस्त्रसाठाही पथकाने हस्तगत केला. या कारखान्यात अमली पदार्थ तयार करून विकणारे दोन आरोपी, त्यांचे साथीदार दाऊद इब्राहिम व कुख्यात तस्कर करिम लाला यांच्याशी संबंधित आहेत. त्यामुळे अमली पदार्थ उत्पादन, विक्रीत गुंतलेल्या या संपूर्ण टोळीस जेरबंद करण्यासाठी दक्षिण मुंबईवर लक्ष केंद्रित केल्याची माहिती एनसीबीच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली. या घटनेनंनंतर आता भाजपाचे नेते आशिष शेलार यांनी राज्यातील महाविकास आघाडी सरकारकडे ‘मुंबईतील ड्रग्स नेटवर्क उद्ध्वस्त करा, त्यासाठी ड्रग्स माफियांविरोधात युद्ध पुकारा’, अशी मागणी केली आहे.


“मुंबईतील अवैध अमली पदार्थांच्या नेटवर्कमध्ये एनसीबीने दाऊद इब्राहिम गँगची लिंक शोधली आहे. मुंबई पोलिस आणि महाविकास आघाडी सरकारने मुंबईतील ड्रग्स नेटवर्क उद्ध्वस्त करण्यासाठी युद्ध पुकारण्याची गरज आहे. याबाबत मुंबईच्या पोलीस आयुक्ताना पत्र लिहिलं असून मुंबई पोलिसांनी आता कारवाई करण्याची गरज आहे”, असं शेलार यांनी म्हटलंय. यासोबतच वांद्रे, खार आणि सांताक्रूझ परिसरात ड्रग्सचे अड्डे असल्याचंही त्यांनी पत्रात नमूद केलंय. ट्विटरद्वारे शेलार यांनी ही माहिती दिली.

आणखी वाचा- डोंगरीत ‘एमडी’चा कारखाना उद्ध्वस्त!

दरम्यान, एका दिवसापूर्वीच दक्षिण मुंबईत पाब्लो एस्कोबार(कोलंबियातील ड्रग माफिया) या नावाने ओळख असलेल्या परवेझ खान ऊर्फ चिंकू पठाण याला एनसीबीने घणसोली येथून अटक केली. घणसोली येथील चिंकूच्या घरातून अद्ययावत पिस्तूल आणि अमली पदार्थांचा साठा हस्तगत करण्यात आला. चौकशीदरम्यान त्याने आपला साथीदार आरिफ भुजवाला याचे नाव घेतले. भुजवाला डोंगरी येथील नूर मंझिल इमारतीतील भुजवाला याच्या आलिशान घरात एनसीबीने बुधवारी रात्री छापा घातला. या इमारतीतील एनसीबीची शोधमोहीम गुरुवारी सकाळी पूर्ण झाली. शोधमोहिमेत भुजवाला याच्या घरातूनही अद्ययावत पिस्तूल आणि दोन कोटी १८ लाख रुपयांची बेहिशोबी रोकड आढळली. तसेच या इमारतीत भुजवाला याने एमडी निर्मितीसाठी चिंकू व अन्य साथीदारांच्या मदतीने सुरू के लेल्या गुप्त कारखान्याची माहिती हाती लागली. या कारखान्यात सुमारे सहा किलो तयार एमडी, एक किलो मॅथाएम्फे टामाइन आणि सहा किलो एफिड्रीनचा साठा आढळला. तसेच तेथे वजन काटे, वेष्टनासाठी लागणारे साहित्यही मोठ्या प्रमाणावर आढळले. कारवाईदरम्यान भुजवाला याच्या निवासस्थानाहून जप्त करण्यात आलेली सव्वादोन कोटींची बेहिशोबी रोकड एमडी विक्रीतून गोळा केलेली असावी, असा संशय आहे.

चिंकू पठाण कोण?
-एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांनी दिलेल्या माहितीनुसार चिंकू आणि भुजवाला मुंबई महानगर प्रदेशातील अमली पदार्थांचे सर्वात मोठे वितरक, विक्रे ता आहेत. संघटित गुन्हेगारी टोळीच्या मदतीने त्यांचा हा अवैध धंदा अनेक वर्षे सुरू होता.
-चिंकू दाऊदचा नातेवाईक असून करिम लाला याच्याशीही त्याचे नातेसंबंध आहेत.
-एमडी विक्रीसाठी त्याने दक्षिण मुंबईतील विशेषत: डोंगरी, नागपाडा, जेजे मार्ग परिसरात वास्तव्य करणाऱ्या, गुन्हेगारी पाश्र्वाभूमीच्या आणि दाऊद किं वा करिम लाला यांच्याशी संबंधित व्यक्तींना आपल्या टोळीत सहभागी करून घेतल्याची माहितीही एनसीबीच्या हाती लागली आहे.
-चिंकू विरोधात पायधुनी पोलीस ठाण्यात अनेक गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे. पोलिसांना मारहाण के ल्याबद्दलही त्याला अटक करण्यात आली होती. चिंकू आणि भुजवाला यांच्या मालमत्तांबाबतही एनसीबीकडून तपास होणार आहे.