अर्जासोबत लग्नपत्रिका, घराचा आराखडा सादर करण्याचा फतवा
तुमच्या हक्काची अर्जित किंवा धनार्जित रजा हवी असेल तर रजेच्या अर्जासोबत लग्नपत्रिका, घराचा नगरपालिकेने मंजूर केलेला आराखडा किंवा डॉक्टरचे प्रमाणपत्र सादर करा, मगच रजेचा विचार केला जाईल, असा अजब फतवा मुंबई पोलिसांच्या अप्पर आयुक्तांनी काढला आहे. यामुळे पोलीस वर्तुळात तीव्र नाराजी पसरली आहे.
पोलिसांमध्ये निरीक्षकापर्यंतच्या सर्व पोलीस कर्मचाऱ्यांना वर्षांला ३० दिवसांची अर्जित रजा मिळते. यातील काही दिवसांची रजा ते उपभोगतात तर काही दिवसांची रजा धनाíजत करतात. मात्र, वर्षभरात ही सुट्टी गरजेनुसार कधीही घेता येत असली तरी या रजेची मंजुरी मात्र एकदाच तीही वर्षांच्या सुरुवातीलाच घ्यावी लागते. एकदा आपल्या विभागाच्या अप्पर पोलीस आयुक्तांकडून ही रजा मंजूर झाली की मग वर्षभरात वरिष्ठ पोलीस निरीक्षकाच्या परवानगीने गरजेनुसार ती घेता येते. आजवरच्या परंपरेनुसार यावेळीही हजारो पोलिसांनी हक्काच्या अर्जित रजेसाठी अर्ज केले. मात्र दक्षिण प्रादेशिक विभागाच्या अप्पर आयुक्तांनी हे सर्व अर्ज परत पाठविल्याने पोलिसांना धक्का बसला. काही पोलिसांनी याबाबत आपल्या वरिष्ठांकडे विचारणा केली असता त्यांना देण्यात आलेले कारण तर आणखीनच संतापजनक होते. अप्पर पोलीस आयुक्तांच्या एका आदेशानुसार वर्षभरात केव्हाही रजा घेणार असला तरी आता रजेच्या अर्जासोबत ती कोणत्या कारणांसाठी घेणार आहात, याचे स्पष्ट पुरावे सादर करण्याचे पोलिसांना फर्माविण्यात आले आहे. रजेच्या अर्जासोबत लग्नासाठी हवी असेल तर लग्नपत्रिका, ऑपरेशनसाठी हवी असल्यास त्याबाबतची कागदपत्रे म्हणजेच डॉक्टरचे प्रमाणपत्र, घरदुरुस्तीसाठी रजा हवी असेल तर त्याबाबतचा आराखडा, नगरपालिकेची मान्यता आदी पुरावे सादर केल्याशिवाय कोणत्याही अर्जाचा विचार केला जाणार नाही, असे आदेश सर्व पोलीस ठाण्यांना देण्यात आले आहेत.