पोलीस नोटीसपाठोपाठ वैयक्तिक अहवालावर जोर

पोलीस दलाचा ८० टक्के भाग ज्या शिपाई, हवालदार, सहायक उपनिरीक्षकांनी व्यापला आहे, त्यांना प्राधान्य देत मुंबई पोलिसांनी सध्या ‘पेपरलेस’ कार्यपद्धतीकडे वाटचाल सुरू केली आहे.

९३ पोलीस ठाण्यांतील अंतर्गत पत्रव्यवहार हा काही महिन्यांपूर्वी ई-मेलवर सुरू झाला असून आता प्रत्येक पोलिसाला स्वतंत्र मेल आयडी देऊन त्यांच्या वैद्यकीय तसेच अन्य बाबींबाबतचा वैयक्तिक अहवालही एका क्लिकवर उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न सुरू आहे. छोटय़ा-मोठय़ा पत्रव्यवहारासाठी पोलिसांची होणारी पायपीट पूर्णपणे बंद करण्यात येणार आहे.

पोलिसाला आठ तास डय़ुटी आणि साप्ताहिक रजा यासाठी आग्रही असलेले विद्यमान पोलीस आयुक्त दत्ता पडसलगीकर यांनी आता पेपरलेस कार्यपद्धतीकडे वाटचाल सुरू केली आहे. पोलिसांचा मुख्य गाभा असलेल्या शिपाई, नाईक, हवालदार तसेच सहायक उपनिरीक्षकांना अधिकाधिक सुविधा उपलब्ध करून देण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. त्यामुळेच एकेक योजना राबविण्यास त्यांनी सुरुवात केली आहे. कुठलीही प्रसिद्धी न घेता सुरू केलेल्या या मोहिमेला आता दीड वर्षांनंतर प्रत्यक्षात यश येऊ लागले आहे.

सध्या ९३ पैकी ५८ पोलीस ठाण्यात आठ तास डय़ुटीची योजना यशस्वीपणे राबविली गेली आहे. एका क्लिकवर या वरिष्ठांना पोलीस ठाण्याच्या पातळीवरील अहवाल तसेच इतर पत्रव्यवहार उपलब्ध होत आहे.