अंधेरी पूर्वेतील मरियमनगर परिसरात देशी मद्याची विक्री करणाऱ्या सवमुघताई तेवर या ७० वर्षे वयाच्या महिलेचा मृतदेह तिच्या राहत्या घरात आढळला. धारदार हत्याराने खून करून तिच्या अंगावरील सोन्याचे दागिने चोरून नेण्यात आले होते. याप्रकरणी सहार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. मध्यरात्रीच्या वेळेत ही हत्या झाली होती. प्रत्यक्षदर्शी साक्षीदार कोणीही नव्हते. अर्थातच या झोपडपट्टी परिसरात सीसीटीव्ही फुटेज असण्याची शक्यता नव्हतीच. स्थानिक पातळीवरील खबऱ्यांकडूनच त्याबाबत अधिक माहिती मिळविता आली असती. परंतु त्यातही सुरुवातीला यश आले नाही. एप्रिल २०१५ मध्ये झालेल्या या गुन्ह्यची उकल काही केल्या होत नव्हती. सहार पोलीस ठाण्यासह गुन्हे अन्वेषण विभागाचे पथकही समांतर तपास करीत होते. सहार पोलिसांच्या न उलघडलेल्या गुन्ह्यंच्या यादीत नियमितपणे या खुनाची चर्चा होत असे. परंतु काही केल्या या प्रकरणाची उकल होत नसल्यामुळे पोलीस ठाणेही अस्वस्थ होते.

ज्या दिवशी मृतदेह आढळला त्यावेळी सहार पोलिसांच्या पथकाने घटनास्थळाची बारकाईने तपासणी केली होती. परंतु कोणताही धागादोरा पोलिसांच्या हाती लागला नव्हता. यासाठी विशेष पोलीस पथकेही तयार करण्यात आली होती. ही पथके वारंवार घटनास्थळी येऊन तपासणी करीत होती. वेशांतर करूनही या पथकातील काही पोलिसांनी या खुनामागील रहस्य उलगडण्याचा प्रयत्न केला. परंतु हाती काहीही लागले नाही. या परिसरातील संशयित इसम, नातेवाईक अशा १७३ जणांची कसून चौकशी करण्यात आली. यापैकी ९७ जणांच्या बोटांचे ठसेही घेण्यात आले. तरीही कुठेही साम्य आढळले नाही. उपजीविकेसाठी मद्यविक्री करणाऱ्या या महिलेची हत्या नेमकी कशामुळे झाली असावी, याबाबत काहीच दुवे मिळत नव्हते. सवमुघताई हिच्या मागे कोणीही नव्हते. तिच्या नातेवाईकांकडेही विचारपूस करण्यात आली. मोबाइल फोनच्या टॉवरवरून काही संशयितांच्या क्रमांकांची विचारपूस झाली. परंतु तांत्रिक मदतही काही उपयोगी नव्हती. तिचे कोणाशीही शत्रुत्व नव्हते. घटना घडली त्या दिवशी तिच्याकडे मद्यपान करण्यासाठी आलेल्या प्रत्येकाची चौकशी करण्यात आली. परंतु त्यांच्याकडूनही काही विशेष हाती लागले नाही. त्यामुळे या हत्येचा तपास पोलिसांसाठी एक आव्हानच झाले होते.

तत्कालीन सहायक पोलीस आयुक्त सुरेश वेदक तसेच वरिष्ठ निरीक्षक बाबुराव मुखेडकर यांच्या नेतृत्वाखाली निरीक्षक दत्तात्रय धोपटे, सावळाराव आगवणे, सहायक निरीक्षक बाजीराव नाईक, प्रणय काटे, उपनिरीक्षक दत्तात्रय गुरव तसेच हवालदार सुमंत भोसले, प्रकाश सोनवणे, तुकाराम कारंडे, मदन गायकवाडादींचे पथक पुन्हा कामाला लागले. काहीही  करून या हत्येची उकल करण्याचेच या पथकाने मनोमन ठरविले. ज्या अर्थी तिची कुणाशी दुश्मनी नव्हती म्हणजे मद्याची खरेदी करण्यासाठी येणाऱ्यांपैकी कुणाचा या हत्येशी संबंध असावा, असे या पथकाला वाटत होते. त्यामुळे सर्वच संशयितांची पुन्हा कसून चौकशी केली. तेव्हा त्यापैकी एक जण सतत ‘मला त्रास देऊ नका, मी आत्महत्या करीन’ वगैरे पोलिसांना धमकावत असे. त्यावेळी पोलिसांनी त्याला सोडून दिले होते. त्याला पुन्हा चौकशीसाठी बोलाविण्यात आले. तेव्हाही त्याचे तेच पालुपद सुरू होते. वय वर्षे २१. नाव – संतोष ऊर्फ पप्या बाळा जाधव. ‘आपण पोलिसांना घाबरतो. आपला हत्येशी काहीही संबंध नाही. पुन्हा जर बोलाविले तर आत्महत्या करीन’, अशी त्याने पुन्हा धमकी दिली. त्यामुळे त्याच्या प्रत्येक हालचालीवर या पोलीस पथकाने पाळत ठेवली. मद्यपान करणाऱ्या काही खबऱ्यांनाही त्याच्यावर लक्ष ठेवण्यास सांगितले. काही केल्या त्याच्याकडून काहीही माहिती मिळत नव्हती. परंतु हत्येचा दुवा त्याच्याकडूनच मिळेल, असे या पथकाला वाटत होते. महिना उलटला तरी काहीही फायदा झाला नव्हता. एकेदिवशी दारूच्या नशेत तर्र असलेल्या पप्या ऊर्फ संतोषने मित्राकडे हत्येची कबुली दिलीच. पोलिसांना आपला शोध कसा लागू शकत नाही, असेही तो बरळू लागला. पोलिसांचा खबऱ्या तेथेच होता. पप्याला या पथकाने ताब्यात घेतले. पुन्हा त्याने आत्महत्येचेच पालुपद लावले. पोलीस खाक्या मिळताच पप्या पोपटासारखा बोलू लागला. तब्बल वर्षभरानंतर गुन्ह्याची उकल करण्यास या पथकाला यश आले होते.

‘मी मृत महिलेकडे दररोज दारू पिण्यासाठी जात असे. तिच्या अंगावर भरपूर सोन्याचे दागिने होते. तिच्याकडे पैसाही बक्कळ असेल, असे मला वाटले. प्रेम साने या मित्राला ही माहिती दिली. आम्ही दोघांनी मिळून तिच्या घरी चोरी करण्याचे ठरविले. उशिरा मध्यरात्री तिच्याकडे चोरी करण्याच्या हेतूने घरात शिरलो. फारसे काही हाती लागले नाही. मात्र चोरी करताना आवाज झाल्याने ती महिला जागी झाली. तिने आम्हाला हटकले. आम्हाला पकडण्याचा प्रयत्न केला. परंतु आम्ही तिला खाली पाडले आणि घरातील चाकूने तिच्यावर सपासप वार केले. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या महिलेल्या अंगावरील दागिने आणि पैसे चोरून पोबारा केला. आमचा तिला मारण्याचा इरादा नव्हता. परंतु ती खूपच मोठमोठय़ाने ओरडत होती. त्यामुळे तिला ठार मारण्यावाचून गत्यंतर नव्हते..’ अशा शब्दांत पप्पूने आपल्या गुन्ह्याची कबुली दिली.

वर्षभरापूर्वी झालेल्या व वरवर क्षुल्लक वाटणाऱ्या या हत्येप्रकरणाने सहार पोलिसांची झोप मात्र उडविली होती. अखेर हत्येची उकल झाली आणि तपास पथकही सुखावले. कदाचित त्याचमुळे या पथकाला पोलीस आयुक्तांचा प्रत्येक महिन्यातील उत्कृष्ट तपासाबद्दल असलेला पुरस्कारही मिळाला.

निशांत सरवणकर -nishant.sarvankar@expressindia.com

@ndsarwankar