पोलीस आयुक्त राकेश मारिया यांनी मुंबईच्या आयुक्तपदाचा पदभार स्वीकारल्यानंतर मुंबईत झालेल्या तीन खूनांच्या प्रकरणांचा छडा लावण्यात मुंबई पोलिसांना यश आल्याचे पोलिसांतर्फे सांगण्यात येत आहे. हे तीनही खून मार्च महिन्यात विविध पोलीस ठाण्यांच्या हद्दीत झाले होते. घाटकोपर, पंत नगर आणि भांडुप या पोलीस ठाण्यांच्या हद्दीत घडलेल्या या प्रकरणांचा संबंधित पोलीस ठाण्यांनी उलगडा केला आहे. २६ मार्च रोजी घाटकोपर पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक बेवारस मृतदेह सापडला होता. प्रथमदर्शनी एका हिंदू साधूच्या वाटणाऱ्या या मृतदेहाची ओळख अद्याप पटलेली नाही. या व्यक्तीला दगडाने ठेचून मारण्यात आले होते. हा खून घाटकोपर येथील झोपडपट्टीत राहणाऱ्या सुहास शिंदे या तरुणाने केल्याचे पोलिसांनी शोधून काढले आहे. सुहासने हा खून चोरीच्या उद्देशाने केला होता, अशी माहिती परिमंडळ-७चे पोलीस उपायुक्त महेश गुर्ये यांनी दिली. रमेश बद्रिप्रसाद याच्या खुनासाठी जबाबदार असलेल्या करण लोधी या रमेशच्या मित्राला भांडुप पोलिसांनी अटक केली. करणने आपला मोबाइल फोन चोरला आहे, असा संशय रमेशला होता. त्यावरून त्यांच्यात मारामारी झाली. मात्र या मारामारीदरम्यान रमेशला डोक्याला आणि छातीवर प्रचंड मार लागला आणि त्याचा मृत्यू झाला. या घटनेनंतर करण उत्तर प्रदेशातील आपल्या गावी पळून गेला होता. मात्र पोलिसांनी त्याला अटक केली.
पंतनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत नीरज ठाकुर या तरुणाचा खून १३ मार्च रोजी झाला होता. त्यानंतर त्याचा मृतदेह एका सार्वजनिक शौचालयाबाहेरील बोअरवेलमध्ये टाकण्यात आला होता. या प्रकरणाचा तपास करताना पोलिसांनी दोघांना अटक केली. या दोघांमध्ये नीरजची पत्नी रूबी हिचाही समावेश आहे. रूबीने प्रशांत चौधरी उर्फ नानकी याच्या मदतीने नीरजचा खून केला. रूबीच्या म्हणण्यानुसार नीरज तिला मारहाण करत असे. त्यामुळे दुसर्यावर प्रेम बसलेल्या रुबीने नानकीच्या मदतीने नीरजचा काटा काढला, अशी माहिती परिमंडळ७ चे उपायुक्त महेश गुर्ये यांनी दिली.