शहरात २५९ ठिकाणी धरपकड, ३९ फरार आरोपी अटकेत

मुंबई :  शहरातील कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी मुंबई पोलिसांतर्फे शनिवारी रात्री ‘ऑपरेशन ऑल आउट’ हे अभियान राबविले. पोलिसांनी शहरातील सुमारे २५९ ठिकाणी कारवाई (कोम्बिंग) करून ३९ फरार आरोपींच्या मुसक्या आवळल्या. कारवाईत अमली पदार्थ कायद्यान्वये ८८ जणांना अटक करण्यात आली, तर अवैध शस्त्रे बाळगणाऱ्या ३७ जणांवर कारवाई करून त्यांच्याजवळील शस्त्र जप्त केली.

शहरातील मुख्य रस्त्यांवर नाकाबंदी, पायी गस्त, हॉटेलांची झडती, वस्त्यांमध्ये तपासणी करून पोलिसांनी अभिलेखावरील गुन्हेगारांवर जरब बसविली. कारवाईत पाच प्रादेशिक विभागांचे अतिरिक्त आयुक्त, १३ परिमंडळांचे उपायुक्त, विभागीय साहाय्यक आयुक्त, सर्व पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक आणि अंमलदार सहभागी झाले होते. शनिवारी रात्री ११ ते रविवारी पहाटे २ पर्यंत पोलिसांनी ही कारवाई केली.

कारवाईत पोलिसांनी अभिलेखावरील १२७८ आरोपींची तपासणी केली. यात ५९९ आरोपी आढळले. कारवाईत ३९ ‘पाहिजे’ आणि फरार आरोपींना पोलिसांनी अटक केली. तर तपासणीत ३७ तडीपार केलेले आरोपी सापडले. तर अजामीनपात्र वॉरंटमधील १७६ जणांना अटक केली. बेकायदेशीर वास्तव्य करणाऱ्यांवर प्रतिबंधात्मक कारवाईच्या अनुषंगाने ९५१ हॉटेल, निवासी हॉटेल व अन्य आस्थापनांची तपासणी केली. शहरात अवैधरीत्या सुरू असलेल्या दारू आणि जुगाराच्या ४२ ठिकाणांवर छापा मारून पोलिसांनी ७१ जणांना अटक केली. शहरात जागोजागी बसणाऱ्या १३५ अनधिकृत फेरीवाल्यांवरही या वेळी कारवाई केली गेली. तसेच ५० भिकारी पकडले.

दरम्यान पोलिसांनी संवेदनशील आणि मर्मस्थळे असलेल्या ५०५ ठिकाणांची तपासणी करून आवश्यक प्रतिबंधात्मक उपाययोजना केल्या. पोलिसांनी शहरात १४९ ठिकाणी कडक नाकाबंदी केली होती. यात ११ हजार ८८१ दुचाकी आणि चारचाकी वाहनांची तपासणी केली. यातील ३ हजार १४१ वाहन चालकांवर मोटारवाहन कायद्यान्वये कारवाई करण्यात आली. तर मद्यप्राशन करून वाहन चालविणाऱ्या ३१ वाहनचालकांवरही पोलिसांनी कारवाई केली.