अनधिकृत झोपड्यांवरील कारवाईचे वार्तांकन करताना मुंबई पोलिसांनी मारहाण केल्याचा आरोप महिला पत्रकार प्रियांका बोरपुजारी यांनी केला आहे. तर बोरपुजारी यांनी कारवाईत अडथळे आणून स्थानिकांना चिथावणी देण्याचा प्रयत्न केल्याचा दावा पोलिसांनी केला आहे. याप्रकरणी पोलिसांनी प्रियांका बोरपुजारी यांच्यासह पाच जणांविरोधात गुन्हा दाखल करत त्यांना ताब्यात घेतले.

मुंबईतील कलिना येथील अनधिकृत झोपड्यांवर महापालिकेच्या पथकाने कारवाई केली. पोलीस बंदोबस्तात ही कारवाई झाली. मुक्त पत्रकार प्रियांका बोरपुजारी या वार्तांकनासाठी गेल्या होत्या. यादरम्यान पोलिसांनी कारवाईचे चित्रीकरण करणाऱ्या प्रियांका यांचा मोबाईल हिसकावून घेतला. पोलिसांनी प्रियांका यांना मारहाण केल्याचा आरोपही आहे. कारवाई दरम्यान पोलिसांनी लहान मुलांना मारहाण केल्याचा व्हिडिओ प्रियांका यांच्याकडे होता, असेदेखील समजते.

प्रियांका यांनी एका ख्यातनाम इंग्रजी वृत्तपत्राच्या वरिष्ठ पत्रकाराशी संपर्क साधला. संबंधित पत्रकाराने ट्विटरद्वारे मुंबई पोलिसांचे या घटनेकडे लक्ष वेधले. यानंतर मुंबई पोलिसांनी या घटनेवर स्पष्टीकरण दिले. ‘पत्रकाराचे वैध ओळखपत्र नसल्याने प्रियांका यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. जमावाला घोषणाबाजी करण्यासाठी त्यांनी चिथावणी देखील दिली’ असे पोलिसांनी म्हटले आहे. याप्रकरणी पोलिसांनी प्रियांका यांच्यासह पाच जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. प्रियांका बोरपुजारी यांनी अनेक ख्यातनाम इंग्रजी वृत्तपत्रांमध्ये लिखाण केले असून इंटरनॅशनल वुमन मीडिया फाऊंडेशनच्या त्या सदस्य आहेत.