फ्लिट टॅक्सी चालक आणि त्यांच्या पाश्र्वभूमीबाबत दिल्लीतील उबर प्रकरणानंतर रण पेटल्यानंतर मुंबई पोलिसांनी हातात घेतलेली टॅक्सी चालक तपासणी मोहीम पूर्ण झाली आहे. पोलिसांनी तब्बल साडेआठ हजार टॅक्सींची पडताळणी पूर्ण केली आहे. यातील अनेक टॅक्सी चालक-मालक यांनी वाहतूक विभागाकडे नोंदवलेले पत्ते बदलले असल्याचे या पडताळणीतून समोर आले आहे. अशा चालकांबाबत टॅक्सी संघटना आणि कंपनी यांना माहिती देण्यात आली आहे.
खासगी टॅक्सी चालवणारे चालक आणि त्यांच्या मालकांची पडताळणी करण्याचे आदेश मुंबई पोलीस आयुक्त राकेश मारिया यांनी दिले होते. त्यानुसार वाहतूक विभागाने ही मोहीम हाती घेतली होती. यात खासगी, रेडिओ, काळ्या-पिवळ्या अशा तेरा हजारांहून अधिक टॅक्सींची पडताळणी होणार होती. यापैकी साडेआठ हजारांच्या आसपास टॅक्सींची तपासणी पूर्ण झाली आहे. त्यातील हजारो टॅक्सी चालक व मालक यांनी नोंदवलेले पत्ते चुकीचे आहेत किंवा त्या पत्त्यांवर आता ते राहत नाहीत, हेदेखील समोर आले.