करोनामुळे मुंबई पोलिसांवर कायदा व सुव्यवस्थेचा ताण वाढला आहे. त्यातही मुंबईतील करोना बाधित रुग्णांची संख्या मोठी असल्यानं पोलिसांना गर्दी टाळण्यासाठी कडा पहारा द्यावा लागत आहे. त्यातच मुंबईत मागील आठवडाभरापासून जोरदार पाऊस सुरू असून, रस्त्यावर पडणारी झाडं, वाहतूक कोंडी टाळण्यासाठी पोलिसांकडून पावसातही कर्तव्यभान राखलं जात आहे. तर महत्त्वाची गोष्ट म्हणजे पाऊस सुरू झाल्यानंतर ट्विटर इंडियानं एक प्रश्न विचारला होता. त्यावर मुंबई पोलिसांनी कडक उत्तर देत नेटकऱ्यांची मनं जिंकली.

मुंबई पोलिसांच्या ट्विटर हॅण्डलवरून मदतीबरोबरच जनजागृती करणारे ट्विट केले जातात. त्याचबरोबर वेगवेगळ्या ठिकाणी पोलिसांकडून केल्या जाणाऱ्या कामाचं कौतुकही केलं जातं. मागील काही दिवसांपासून मुंबई पोलीस करोनाबरोबरच पावसामुळे मुंबईकरांना होणारा त्रास टाळण्यासाठी भर पावसात कर्तव्य बजावताना दिसत आहे. अशातच ‘ट्विटर इंडिया’नं पाऊस सुरू झाल्यानंतर एक ट्विट केलं. “पाऊस पडतोय तुम्ही कोठे आहात?,” असा प्रश्न विचारला होता. त्याला मुंबई पोलिसांनी भन्नाट उत्तर दिलं. “कफ परेड येथेऑन ड्यूटी आहे. कामाप्रती निष्ठा हीच मुंबई पोलीसांची प्रतिष्ठा….” असं कडक उत्तर दिलं.

मुंबई पोलिसांनी दिलेल्या उत्तरानं अनेकांची मनं जिंकून घेतली. त्यावर एका नेटकऱ्यांनं मुंबईकर म्हणून अभिमान आहेच. पण, शूर व मदत करणारे पोलीस बघून आणखी गौरवास्पद वाटतं. शूर पोलीस सोबत असल्यामुळे आम्हा मुंबईकरांना काळजी नसते,” असं म्हटलं आहे.