मुंबईच्या समुद्रकिनाऱ्याजवळ दुबईहून आलेले ‘एमएसव्ही युसुफी’ नावाचे संशयास्पद जहाज तटरक्षक दलाने ताब्यात घेतले आहे. गुप्तचर यंत्रणेकडून मिळालेल्या माहितीनंतर नौदलाच्या मदतीने ही कारवाई करण्यात आली. जहाजावरील पाच भारतीय कर्मचाऱ्यांनाही ताब्यात घेतले आहे.
संशयास्पद जहाज येणार असल्याची माहिती गुप्तचर विभागाकडून मिळाल्यानंतर तटरक्षक दल व नौदलाने समुद्रात गस्त वाढवून हेलिकॉप्टरच्या मदतीने शोध सुरू केला होता. मंगळवारी मुंबई समुद्रकिनाऱ्यापासून पाच सागरी मैल (सुमारे साडेनऊ किलोमीटर) अंतरावर हे जहाज आढळले.  तटरक्षक दलाने जहाजावरील अहमद अ‍ॅडम पालेजा (४५), इक्बाल हसन उमी (४१), याकुब अबुबकर थकेरा (४३), अब्दुल रझ्झाक उस्मर मंडवानी (३२) आणि युसुफ आसाम बोलीम (३०) कर्मचाऱ्यांना ताब्यात घेतले आहे. हे सर्वजण गुजरातच्या भूजमध्ये राहणारे आहेत. ते सर्वजण दुबई येथील उस्मान नावाच्या इसमाच्या संपर्कात होते. सॅटेलाइट फोनवरून त्यांनी केलेल्या संभाषणामुळेच हे जहाज पकडणे सोपे झाले. साहित्य घेऊन जहाज श्रीलंकेत नेण्यात येणार होते. परंतु इंजिनात तांत्रिक बिघाड झाल्याने ते मुंबईच्या दिशेने वळविले होते. तटरक्षक दलाला पाहून कर्मचाऱ्यांनी जहाजातील सॅटेलाइट फोन पाण्यात फेकून दिले होते. परंतु तटरक्षक दलाने पाच सॅटेलाइट फोन शोधून काढण्यात यश मिळवल्याचे पोलीस उपायुक्त तानाजी घाडगे यांनी सांगितले. सध्या यलो गेट पोलीस या कर्मचाऱ्यांची चौकशी करीत आहेत. सिगारेटमध्ये अमली पदार्थ आहे का, त्याचा तपास करण्यासाठी अमली पदार्थविरोधी शाखेच्या पथकानेही चौकशी सुरू केली आहे. दोनच दिवसांपूर्वी सीमा शुल्क खात्याने जेएनपीटी बंदरातून एक संशयास्पद जहाज ताब्यात घेतले होते.

मुंबई हल्ल्यावेळी वापरलेले  थुरायाचे सॅटेलाइट फोन
जहाजाच्या तपासणीत महागडय़ा सिगारेटचे अनेक खोकी, बंदी असलेले थुराया कंपनीचे सॅटेलाइट फोन सापडले. याच प्रकारच्या फोनचा वापर मुंबई हल्ल्यातील दहशतवाद्यांनी केला होता. जहाजात २६ बकरे, दूरचित्रवाणी संच तसेच मोबाइलचे सुटे भाग आदी साहित्य आढळले होते. तस्करी करून हा माल नेण्यात येत होता.