यू टय़ूब, ट्विटर, फेसबुक वा तत्सम सोशल मीडियावर अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली कोणत्याही पद्धतीने व्यक्त झालात तरी तुमच्या प्रत्येक विधानावर मुंबई पोलिसांची नजर आहे. सोशल मीडियावरील घडामोडींवर पाळत ठेवण्यासाठी मुंबई पोलिसांनी २५ पोलिसांचा विशेष कक्ष स्थापन केला आहे. हा कक्ष २४ तास या मीडियावर नजर ठेवून असून गरज भासल्यास वादग्रस्त विधाने वा छायाचित्रे वा व्हिडीओ परस्पर उडविले जात आहेत. यामुळेच मुंबईत कुठल्याही प्रकारचा भावनिक क्षोभ उसळलेला नाही, असा दावा पोलीस आयुक्त डॉ. सत्यपाल सिंग यांनी ‘लोकसत्ता’ला दिलेल्या खास मुलाखतीत केला.
आझाद मैदान येथील हिंसाचारानंतर अरूप पटनाईक यांना पायउतार व्हावे लागले आणि डॉ. सिंग मुंबईचे नवे आयुक्त बनले. पोलिसांचे खच्ची झालेले मनोधैर्य वाढविण्याबरोबरच सोशल मीडियावरील वाढत्या शेरेबाजीमुळे वातावरण गढूळ होण्याची शक्यता होती. त्यामुळे या सोशल मीडियावरील प्रत्येक घडामोडीवर लक्ष ठेवता येईल का, या दिशेने प्रयत्न सुरू होते. अखेरीस काही तज्ज्ञांच्या मदतीने कुठलीही सरकारी आर्थिक मदत नसतानाही २५ पोलिसांचा एक कक्ष स्थापन करण्यात आला. तीन पाळ्यांमध्ये हा कक्ष या सोशल मीडियावर नजर ठेवू लागला. विशेष शाखेचे अतिरिक्त आयुक्त या कक्षाचे प्रमुख असून दररोज दोन अहवाल आपल्याला पाठविले जातात.
काय आढळते आक्षेपार्ह?
* एखाद्या घटनेवरून शिवीगाळ
* प्रक्षोभक विधाने
* देवदेवतांची निंदा करणारी छायाचित्रे
* बडय़ा राजकारण्यांची बनावट छायाचित्रे
* हिंदू वा मुस्लिम संघटनांकडून केली जाणारी आवाहने
मुंबईतच नव्हे तर देशभरात घडत असलेल्या प्रत्येक घटनांवर हा कक्ष लक्ष ठेवून असतो. कुठलेही विधान भावना भडकावण्यासाठी कारणीभूत ठरू शकते वा कुठल्या छायाचित्रांवरून विनाकारण जातीय दंगल उसळू शकते. अशा अनेक बाबींवर हा कक्ष लक्ष ठेवून होता आणि त्यांना जे आक्षेपार्ह आढळले ते प्रसारित होण्याआधीच थांबविण्यात आले. त्याचाच परिणाम म्हणजे संभाव्य घटना आम्हाला टाळता आल्या.
– डॉ. सत्यपाल सिंग, मुंबईचे पोलीस आयुक्त