वेळापत्रक मध्यरात्री, आयत्यावेळी रेल्वेगाडय़ा रद्द

जयेश शिरसाट, लोकसत्ता

मुंबई : परप्रांतीयांच्या पाठवणीसाठी रेल्वे गाडय़ांचे नियोजन करताना रेल्वेकडून मध्यरात्री येणाऱ्या गाडय़ांचे वेळापत्रक, हजारो मजुरांना रेल्वे स्थानकावर आणल्यानंतर रद्द होणाऱ्या वा वेळेत न सुटणाऱ्या गाडय़ा या कारणांमुळे पाठवणीच्या प्रक्रियेत केंद्रस्थानी असलेल्या आणि टाळेबंदीतील बंदोबस्ताने पिचलेल्या पोलीस यंत्रणेची पुरती दमछाक होत आहे. गेल्या दोन दिवसांत याच धरसोड पद्धतीने रेल्वेने तब्बल १०० हून अधिक गाडय़ांचे ‘नियोजन’ केल्याने पोलिसांची तारेवरची कसरत आणखी वाढली आहे.

वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार विशेष गाडय़ांची व्यवस्था सुरू झाल्यापासूच किती गाडय़ा, कु ठून-कुठे धावणार हे वेळापत्रक, मंजुरी (नोटीफाय) मध्यरात्री दोन वाजता येत आहे. प्रत्येक बैठकीत १६०० जणांना गोळा करून स्थानकावर आणण्याची प्रक्रि या वेळखाऊ, जोखमीची असते, हे रेल्वे अधिकाऱ्यांना पटवून देण्याचा प्रयत्न करण्यात आला. तयारीसाठी किमान २४ तास आधी वेळापत्रक जारी करण्याची विनंती के ली गेली. मात्र रेल्वे प्रशासनाकडून ती कधीच गांभीर्याने घेतली गेली नाही. त्यात मंगळवारी मध्यरात्री दोनच्या सुमारास ३५ गाडय़ांचे वेळापत्रक जारी झाले. पहाटे साडेतीनला रेल्वेने आणखी ९२ गाडय़ांचे वेळापत्रक दिले, तेव्हा पोलिसांची झोपच उडाली. पोलिसांची रोज ३० गाडय़ा भरून सोडताना पुरती दमछाक होत होती. त्यात सव्वाशे गाडय़ा पाठवायच्या कशा असा प्रश्न निर्माण झाला.

मंगळवारी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) येथून ४४ गाडय़ा विविध राज्यांसाठी धावणार, असे रेल्वेने जाहीर के ले असले तरी त्यासाठी फक्त एकच फलाट उपलब्ध करून दिला. विशेष म्हणजे ४४ रेल्वेगाडय़ा हाकतील इतक्या लोको पायलटची तजवीज रेल्वेला करता आली नव्हती. श्रमिक बसून तयार होते तरी रेल्वे अधिकाऱ्यांची लोको पायलटसाठी शोधाशोध सुरू होती, अशी माहिती एका जबाबदार अधिकाऱ्याने दिली. यामुळे सीएसएमटीबाहेर ५०हजारांहून अधिक स्थलांतरितांचा खोळंबा झाला, असे या अधिकाऱ्याने स्पष्ट केले. आयत्या वेळी गाडी रद्द होण्याचे प्रसंग महिन्याभरात पोलिसांनी अनेकदा अनुभवले. स्थलांतरितांना स्थानकावर आणणे एकवेळ जमू शके ल पण गाडी रद्द झाल्याने त्या जमावाला समजावून माघारी नेणे जोखमीचे असते. अशा प्रसंगांत भावनांचा उद्रेक होऊन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याचा धोका असतो. याबाबत मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी शिवाजी सुतार यांच्याकडे विचारणा केली असता त्यांनी प्रतिक्रि या दिली नाही.

अशी होते तयारी

मध्यरात्री दोननंतर रेल्वेकडून गाडी कधी सुटणार हे कळले की संबंधित विभागाच्या उपायुक्तांकरवी त्या त्या पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ निरीक्षकांना कळवले जातात. त्यानुसार ५० ते ६० समूहप्रमुखांकरवी नोंदणीकृ त १६०० मजुरांपर्यंत गाडी किती वाजता, कु ठून सुटणार, कु ठे जमायचे ही माहिती पोहोचवली जाते. या मजुरांना गोळा करण्यासाठी महापालिका किं वा अन्य शासकीय यंत्रणांची परवानगी घेऊन एक पटांगण किं वा जागेची व्यवस्था पोलीस करतात. त्यासोबत बेस्ट किं वा एसटीकडे ५० ते ६० वाहनांची मागणी करतात. वाहनांची व्यवस्था के ल्यावर श्रमिकांना मुखपट्टी, सॅनिटायझर, पाण्याची हवाबंद बाटली, एकवेळचे जेवण आदींची ऑर्डर देतात. कोणत्या जिल्ह्य़ात किती मजूर उतरणार, याची यादी संबंधित राज्यांना जाते. जेणेकरून त्या त्या स्थानकांत वाहनांची व्यवस्था करता येईल. या सर्व प्रक्रि येला किमान आठ ते दहा तास लागतात.