कंगना राणावत आणि तिची बहिण रंगोली चांडेल यांच्यावर वांद्रे पोलीस स्टेशनमध्ये विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामध्ये राजद्रोहाच्या कलमाचाही समावेश आहे. त्याचबरोबर या दोघींनाही पुढील आठवड्यात चौकशीसाठी हजर राहण्याचे समन्सही पोलिसांनी पाठवले आहे.

मुंबई पोलिसांनी अपल्या नोटिशीत कंगना आणि रंगोली या दोघींनाही पुढील आठवड्यात सोमवारी आणि मंगळवारी (२६ आणि २७ ऑक्टोबर) तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्याचे निर्देश दिले आहेत. मुंबईच्या वांद्रे पोलीस स्थानकात या दोघींविरोधात विविध कलमांतर्गत एफआयआर दाखल करण्यात आला असून यामध्ये १२४ अ या ‘राजद्रोहा’च्या कलमाचाही समावेश आहे.

त्यानंतर दोन समाजात तेढ पसरवणाऱ्या वक्तव्याबाबत कंगना आणि तिची बहिण रंगोली यांच्याविरोधात वांद्र्यातील महानगर न्यायदंडाधिकारी न्यायालयात तक्रार दाखल करण्यात आली होती. यावर कोर्टाने त्या दोघींवर गुन्हा दाखल करुन तपासाचे आदेश दिले होते. त्यानुसार वांद्रे पोलिसांत या दोघींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला, यामध्ये राजद्रोहाच्या कलमाचाही समावेश आहे.

तसेच कंगनाने नव्या कृषी कायद्यांविरोधात आंदोलन करणाऱ्यांबाबतही वादग्रस्त विधान केलं होतं. सीएएबाबत अफवा पसरवणारे आणि दंगल घडवणारे लोकच आत्ता कृषी कायद्यांबाबत चुकीची माहिती पसरवून देशात ते दहशतीचं वातावरण पसरवत असल्याचं तिनं म्हटलं होतं. याप्रकरणी कर्नाटकातील कोर्टात तिच्याविरोधात तक्रार दाखल झाली होती. याप्रकरणीही कोर्टाने कंगनावर एफआयआर दाखल करुन चौकशीचे आदेश दिले होते.