देशात आणि राज्यात करोनाचे रुग्ण झपाट्याने वाढत असल्याने चिंतेचं वातावरण आहे. यामुळे पुन्हा एकदा सरकार आणि आरोग्य विभागात करोनाशी संबंधित सुरक्षेच्या नियमांचं पालन करण्याचं वारंवार आवाहन करत आहे. यादरम्यान मुंबई पोलिसांनी एक ट्विट करत मास्क वापरण्याचं महत्व सांगण्याचा प्रयत्न केला आहे. करोनाचा फैलाव रोखण्यासाठी घराबाहेर पडताना मास्क घाला अशा संदेश मुंबई पोलिसांनी दिला आहे. मात्र यावेळी त्यांनी पुन्हा एकदा हटके ट्विट करत सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे.

मुंबई पोलिसांनी जनजागृती करताना त्यात थोडा ट्विटस्ट दिला असून मनिषा कोईलाराच्या ‘आज मैं ऊपर’ गाण्याचा वापर केला आहे. १९९६ मध्ये आलेल्या ‘खामोशी’ चित्रपटातील हे गाणं आहे. मुंबई पोलिसांनी ट्विट करताना म्हटलं आहे की, “आज मैं ऊपर…क्योंकी मास्क है नीचे”.

हा फोटो पोस्ट करताना मुंबई पोलिसांनी व्हायरसला खामोश करण्यासाठी आपला मास्क व्यवस्थित घाला असं म्हटलं आहे. सर्व नियमांचे पालन करून आपण राहूया ‘आगे’, करोनाला सोडुया ‘पीछे’ असाही संदेश त्यांनी ट्विटमध्ये दिला आहे.

महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून करोना रुग्णसंख्या वेगाने वाढत आहे. १७ फेब्रुवारीला ५४९३ वरुन ही रुग्णसंख्या २४ मार्चला ३४ हजार ४५६ वर पोहोचली आहे. दिवसाला मृत्यू होण्याचं प्रमाणदेखील वाढलं आहे. १० फेब्रुवारीला दिवसाला ३२ मृत्यू नोंदवण्यात आले होते. २४ मार्चला ही संख्या ११८ वर पोहोचली आहे.