मुंबईत पोलीस अधिकाऱ्याचं करोनामुळे निधन झालं आहे. वाकोला पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक मोहन दगडे यांचं करोनामुळे निधन झालं आहे. ते ५४ वर्षांचे होते. करोना पॉझिटिव्ह आल्यानंतर त्यांना बीकेसीमधील कोव्हिड सेंटरमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं. तिथे उपचार सुरु असतानाच पहाटे त्यांनी अखेरचा श्वास घेतला. करोनामुळे आतापर्यंत १०१ कर्मचाऱ्यांच्या निधन झाल्याची माहिती मुंबई पोलिसांनी दिली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वाकोला पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक मोहन दगडे यांना करोनाची लागण झाली होती. त्यांनी बीकेसीमधील जम्बो कोविड सेंटरमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं. प्रकृती खालवल्याने त्यांना आयसीयूमध्ये हलवण्यात आलं होते. मात्र पहाटे ३.३० वाजता त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

भाजपाच्या माजी आमदाराचं निधन
डहाणूतील भाजपाचे माजी आमदार पास्कल धनारे यांचं करोनामुळे निधन झालं आहे. मुंबईच्या नानावटी हॉस्पिटलमध्ये पास्कल धनोरे यांनी अखेरचा श्वास घेतला. करोनाची लागण झाल्यानंतर पास्कल धनोरे यांना गुजरातमधील वापी येथील रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. पण नंतर प्रकृती बिघडल्यानंतर त्यांना मुंबईत आणण्यात आलं होतं. मात्र उपचारावेळी त्यांचं निधन झालं.

पास्कल धनारे २०१४ ते २०१९ या काळात आमदार होते. पालघरमधील हडाणू मतदारसंघातून ते निवडून आले होते. या काळात राज्यात भाजपा-शिवसेनेचं युती सरकार होते. करोनाची लागण झाल्यानंतर पास्कल धनारे यांनी गुजरामधील वापी येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं. पण प्रकृती खालावल्यानंतर रविवारी रात्री त्यांना मुंबईमध्ये हलवण्यात आलं. सोमवारी सकाळी त्यांचं निधन झालं. पास्कल धनारे यांच्यामागे पत्नी, दोन मुली आणि मुलगा असा परिवार आहे.

मुंबईत लवकरच आणखी तीन नवी करोना केंद्रे
करोना रुग्णसंख्या वेगाने वाढत असून, खाटा कमी पडू नयेत, यासाठी मुंबईत आणखी तीन ठिकाणी करोना उपचार केंद्र सुरू करण्यासाठी पालिकेने हालचाली सुरू केल्या आहेत. मालाड आणि कांजूरमार्गमध्ये करोना केंद्र उभारण्यात येणार असून, शहर भागासाठी लवकरच जागा निश्चित करण्यात येणार आहे.

मुंबईत फेब्रुवारीपासून करोनाचा पुन्हा वेगाने फैलाव सुरू झाला. गेल्या आठवड्यापासून रुग्णालयांसह करोना केंद्रांतील खाटा व्यापू लागल्या आहेत. दररोज दहा हजारांवर रुग्णांची नोंद होत असल्याने पालिकेचं आव्हान वाढलं आहे. मुंबई महानगर प्रदेशातूनही रुग्ण मोठ्या प्रमाणावर उपचारांसाठी पालिकेच्या रुग्णालयांमध्ये धाव घेत आहेत. त्यामुळे खाटा वाढविण्यासाठी पालिकेने प्रयत्न सुरू केले आहेत. त्यानुसार, कांजूरमार्ग येथे क्रॉम्पन अ‍ॅण्ड ग्रीव्हज येथे एक मोठे करोना उपचार केंद्र सुरू करण्यात येणार आहे. त्याचे काम सुरू झाले असून, महापौर किशोरी पेडणेकर यांनी या कामाची रविवारी पाहणी केली. जूनपर्यंत हे केंद्र सुरू करण्याचा आमचा प्रयत्न असल्याचे त्यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. त्यातून २००० खाटा उपलब्ध होऊ शकतील. त्यात अतिदक्षता विभागाच्या २०० खाटांचाही समावेश असेल, असेही त्यांनी स्पष्ट केले. पूर्व नगरात एकही करोना उपचार केंद्र नसल्यामुळे रुग्णांना मुलुंडमधील केंद्रामध्ये जावे लागते. तसेच हे केंद्र झाल्यास पालिकेच्या रुग्णालयावरील भार कमी होईल, अशी अपेक्षाही त्यांनी यावेळी व्यक्त केली. येत्या काळात वरळीतही खाटांची संख्या वाढवण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mumbai police vakola police station psi mohan dagde died due to covid 19 sgy
First published on: 12-04-2021 at 12:21 IST