07 December 2019

News Flash

पोलिसांना हेल्मेटसक्ती

पोलीस दलाची नाचक्की टाळण्यासाठी वरिष्ठांकडून दट्टय़ा

पोलीस दलाची नाचक्की टाळण्यासाठी वरिष्ठांकडून दट्टय़ा

स्वत: नियम धाब्यावर बसवून चालकांना हेल्मेट घालण्याविषयीचे ‘ब्रह्मज्ञान’ सांगणाऱ्या पोलिसांची समाजमाध्यमांतून पुरेशी फजिती होत असल्याने वाहन चालवताना हेल्मेट घालाच, असा दट्टय़ा पुन्हा एकदा वरिष्ठ अधिकाऱ्यांनी मुंबई पोलीस दलातील अधिकारी, कर्मचाऱ्यांना दिला आहे. शहरातील सर्व पोलीस उपायुक्तांना त्यांच्या आधिपत्याखालील पोलीस ठाणी, शाखांमध्ये या सूचनांची अंमलबजावणी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

गेल्या आठवडय़ात खेरवाडी येथे घडलेल्या घटनेनंतर कर्तव्यावर असताना, नसताना वाहतुकीचे नियम काटेकोरपणे पाळा, अशा सूचना मुंबई पोलीस दलाला देण्यात आल्या. ३ फेब्रुवारीला वांद्रे पूर्वेकडील खेरवाडी परिसरात पोलीस शिपाई (बीट मार्शल) पंढरीनाथ अलदर हेल्मेट न घालता मोटारसायकलवरून जात होते. दारूच्या नशेतील तीन तरुणांनी त्यांना अडवले. त्यांच्या ताब्यात असलेल्या शासकीय मोटारसायकलची चावी काढून घेतली. हेल्मेट का घातले नाही याचा जाब विचारला, हुज्जत घातली, अर्वाच्च भाषेत शिवीगाळ केली आणि हा सर्व प्रसंग मोबाइलमध्ये चित्रित करून ती चित्रफीत सर्वदूर पसरवली. या चित्रफितीतून पोलीस दलाची चांगलीच नाचक्की झाली होती.

या प्रसंगाची गंभीर दखल वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी घेतली. सहपोलीस आयुक्त (वाहतूक) अमितेष कुमार यांनी एक परिपत्रक काढले आहे. अधिकारी, कर्मचारी कर्तव्यावर असताना, गणवेशात असताना हेल्मेटचा वापर करत नाहीत, असे वारंवार दिसून येते. याआधी तशा स्पष्ट सूचना देण्यात आल्या होत्या. मात्र त्यांचे पालन होत नाही. पोलीस उपायुक्तांनी त्यांच्या आधिपत्याखालील अधिकारी, कर्मचाऱ्यांना परिपत्रकातील सूचना किंवा आदेश बजावावे, असे या परिपत्रकात नमूद आहे.

वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या चालकांविरोधात पोलीस कारवाई करतात आणि दुसरीकडे पोलीसच हे नियम पाळत नाहीत, असे चित्र निर्माण झाल्यास नागरिकांमध्ये गैरसमज पसरतात. पोलीस दलाची प्रतिमा मलिन होते. अनेकदा त्याचे पर्यवसान वादात होते. असे प्रसंग टाळण्यासाठी पोलीस दलातील प्रत्येकाने वाहतुकीचे नियम विशेषत: हेल्मेटबाबतचा नियम पाळावा, अशा सूचना दिल्याचे सहआयुक्त कुमार यांनी स्पष्ट केले.

खेरवाडीतील प्रसंगासोबत जे. जे. उड्डाणपुलावरून विना हेल्मेट दुचाकीवरून जाणारे पोलीस, नो एण्ट्रीत शिरलेले पोलीस वाहन अशा तक्रारी छायाचित्रांसह पोलिसांच्या ट्विटरसह समाजमाध्यमांवर येतात. सोबत पोलीस दलाविरोधात मजकूरही नोंदवला जातो. ही छायाचित्रे सर्वत्र पसरतात. हे  टाळण्यासाठी वरिष्ठांकडून सातत्याने वाहतुकीचे नियम पाळा, अशा सूचना दिल्या जातात.

यापूर्वीचे प्रसंग

  • काही महिन्यांपूर्वी पश्चिम द्रुतगती मार्गावरून सैरावैरा जाणारे पोलीस वाहन अन्य चालकांनी अडवले. गणवेशातील पोलीस चालक दारूच्या नशेत होता आणि इंधन भरून पोलीस ठाण्याच्या दिशेने जात होता, अशी माहिती पुढे आली. ती ध्वनिचित्रफीत चांगलीच चर्चेत आली होती.
  • दुचाकीवरून विना हेल्मेट जाणाऱ्या पंढरीनाथ अलदर यांना गेल्या आठवडय़ात खेरवाडी परिसरात तीन तरुणांनी अडवले. तरुण दारूच्या नशेत होते. आम्हाला विना हेल्मेट पकडता, दंड वसूल करता आणि तुम्हीच नियम मोडता यावरून सुरू झालेली हुज्जत वाढली. ती ध्वनिचित्रफीतही पसरली. याप्रकरणी तिघांविरोधात सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याचा गुन्हा नोंदवण्यात आला.

First Published on February 12, 2019 2:37 am

Web Title: mumbai police with helmet
Just Now!
X