पन्नास वर्षांपूर्वी मुंबईत जबरदस्त दहशत निर्माण केलेला सीरियल किलर रमन राघवच्या मुसक्या आवळणारे पोलीस अधिकारी अॅलेक्स फियालोह यांचे निधन झाले आहे. वयाच्या ९२व्या वर्षी त्यांनी शनिवारी मुंबईत अखेरचा श्वास घेतला. मुंबईकरांना रमन राघवच्या दहशतीतून मुक्त करणाऱ्या फियालोह यांच्या कारवाईवर खूश होऊन पोलीस दलाने त्यावेळी त्यांनी १००० रुपयांचं बक्षीस देऊ केलं होतं. उत्तर मुंबई रमन राघवने पुरुष, स्त्रीया आणि लहान मुलं अशा ४१ लोकांच्या हत्या केल्या होत्या.

सन १९६८ चा पावसाळा हा मुंबईसाठी मोठा दहशतीचा होता. या काळात केवळ दोन महिन्यांत  शहरातील पुरुष, महिला आणि लहान मुलांच्या अतिशय निघृणपणे हत्या होत होत्या. एकामागून एक होत असलेल्या या हत्याकांडामुळे उत्तर मुंबईत प्रचंड दहशत निर्माण झाली होती. दरम्यान, २४ ऑगस्ट रोजी सब इन्स्पेक्टर अॅलेक्स फियालोह यांनी मुंबईतील डोंगरी भागात त्याच्या मुसक्या आवळल्या. या धडाकेबाज कारवाईमुळे सब इन्स्पेक्टर फियालोह यांना मोठी प्रसिद्धी, वाहवा आणि पोलिसी कारकीर्दीला मोठा ब्रेकही मिळाला. रमन राघव सारख्या खतरनाक गुन्हेगाराला पकडणाऱ्या अॅलेक्स फियालोह यांचा राष्ट्रपती पदकाने गौरव करण्यात आला. तसेच यशाची एक-एक पायरी चढत ते सहाय्यक पोलीस आयुक्त म्हणून ते निवृत्त झाले.

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त ज्युलिओ रिबेरिओ यांनी एका मुलाखतीत सांगितले होते की, “फियालोह हे मुंबईत येण्यापूर्वीच एक सेलिब्रेटी होते. त्यांच्याबद्दल मी ऐकून होतो की ते एक चांगले हॉकीपटू असून पोलीस संघात खेळत होते. त्यानंतरच्या वर्षांमध्ये माझा त्यांच्याशी संवाद झाला त्यावेळी मला कळालं की या व्यक्तीला त्याचं काम नक्की काय आहे हे चांगलं ठाऊक आहे. त्यामुळे पुढे ते रमन राघवच्या मुसक्या आवळण्याल्याबद्दल ओळखले जाऊ लागले.” सन २०१६ मध्ये चित्रपट निर्माता अनुराग कश्यपने रमन राघव नावाचा चित्रपट केला होता. यामध्ये नवाजुद्दीन सिद्दीकीने रमन राघवची भूमिका साकारली होती. यावेळी रिबेरे यांची मुलाखत घेण्यात आली होती त्यावेळी त्यांनी फोयालोह यांच्या आठवणींना उजाळा दिला.

राघवला पकडण्यासाठी विशेष पथक

१९६८मध्ये दोन महिन्यांमध्ये मुंबईमध्ये प्रचंड हत्यासत्र सुरु होतं. बेघर लोकांच्या हत्या होत होत्या, त्यामुळे मुंबईत प्रचंड दहशतीचे वातावरण निर्माण झाले होते. लोक रात्र झाल्यानंतर घराबाहेर पडण्यास घाबरत होते. घराबाहेर पडायचंच असेल तर स्वसंरक्षणासाठी स्वतःजवळ काठी किंवा हत्यारं बाळगत होते. त्यावेळी मुंबईचे पोलीस आयुक्त असलेले इमॅन्युएल मोडक हे या हत्यासत्राचा लवकरात लवकर छडा लावण्याच्या प्रयत्नात होते. यासाठी त्यांनी पोलीस निरीक्षक विनायकराव वाकटकर यांच्या नेतृत्वाखाली पथक नेमलं. प्राथमिक तपासानंतर रेकॉर्डवरील एक गुन्हेगार जो मूळचा तामिळनाडूचा रहिवासी आहे अशा रमन राघववर या पथकानं लक्ष केंद्रीत केलं. यावेळी अॅलेक्स फियालोह हे वाकटकर यांच्या टीममध्ये होते. ते कायम आपल्या खिशामध्ये रमन राघवचा फोटो ठेवत होते. दरम्यान, २४ ऑगस्ट १९६८ रोजी त्यांना ही फोटोतली व्यक्ती डोंगरी भागात फिरताना दिसली. त्यानंतर ते त्याच्याजवळ चालत गेले आणि त्याला ताब्यात घेतलं.

रमन राघवला कसं घेतं ताब्यात?
एका मुलाखतीत राघवला कसं ताब्यात घेतलं याबाबत सांगताना फियालोह म्हणाले होते, “राघव हा डोंगरी भागात एक पावसाच्या पाण्याने ओली झालेली छत्री घेऊन पाऊस नसलेल्या सूर्यप्रकाशित डोंगरी भागातून जात होता. तो रमन राघव असल्याची त्यांना शंका होतीच त्यामुळे ते त्याच्यापर्यंत पोहोचले आणि त्यांनी त्याला प्रश्न केला की तू पाऊस नसलेल्या भागात ओल्या छत्रीसह कसा? यावर त्याने सांगितलं की तो मालाडवरुन डोंगरीत आला आहे. त्यावेळी मालाडमध्ये पाऊस सुरु होता. दरम्यान, पोलिसांनी काही दिवसांपूर्वी रमन राघव मालाडमध्येच दिसून आला होता. यावरुन फोयालोह यांनी तात्काळ त्याला ताब्यात घेतलं त्यानंतर चौकशीमध्ये राघवने आपला गुन्हा कबूल केला आणि आपणचं ४० हत्या केल्याचं कबूल केलं. त्यानंतर तो कोर्टात दोषी ठरला आणि त्याला जन्मठेपेची शिक्षा झाली.