मुंबई पोलिसांच्या १०० या हेल्पलाईन क्रमांकावर दररोज ५० हजार फोन कॉल्स येतात. यापैकी ७० टक्के कॉल्स ब्लँक कॉल असतात किंवा मिस्ड कॉल्स असतात अशी माहिती समोर आली आहे. म्हणजेच ५० हजार कॉल्सपैकी ३५ हजार कॉल्स बिनकामाचे असतात. या हेल्पलाईनला कॉलर आयडी असल्याने कोणत्या क्रमाकांवरून फोन आला हे तातडीने समजते. मग पोलिसांनी त्या क्रमांकावर फोन केला की लोक चुकून फोन लागला होता असे उत्तर देतात अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.

‘टाइम्स ऑफ इंडिया’ ने दिलेल्या वृत्तानुसार मुंबई पोलिसांच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने एका मोबाईल क्रमाकांवरून आलेले १ हजार फोन घेतले. मात्र फोन करणारा माणूस कायम शांत बसलेला असतो. या फोन नंबरवर फोन केला असता ज्याने फोन केला त्याच्याच फोनमध्ये बिघाड असल्याची माहिती समोर येते.

१०० या क्रमांकावर त्या माणसाने डायल न करताच नंबर लागतो आणि फोन पोलिसांना लागतो. एका कॉलरची लहान मुले १०० या क्रमांकावर फक्त गंमत म्हणून फोन करतात असेही समोर आले आहे. मलेशियाप्रमाणे भारतातही ब्लँक कॉल किंवा मिस्ड कॉल दिल्यास शिक्षेची तरतूद नाही. आम्ही फक्त फोन करणाऱ्या समज देऊ शकतो तेवढेच आमच्या हातात आहे असे पोलिसांनी म्हटले आहे.

मुंबई पोलिसांच्या १०० या हेल्पलाईनसाठी ५० ऑपरेटर्स प्रत्येकी ८ तासांच्या दोन शिफ्टमध्ये काम करतात. यामधले अनेक जण राज्यांमधलेच असतात. आता एका नव्या सॉफ्टवेअरनुसार १०० नंबर डायल करणाऱ्या कॉलरचे लोकेशनही समजू शकते. ते समजल्यास कोण माणूस कुठून कॉल करतो आहे याची माहितीही पोलिसांना मिळू शकणार आहे.