सरत्या वर्षाला निरोप देताना आयोजित पार्टीसाठी आणण्यात आलेले सुमारे ३ किलो अंमलीपदार्थ मुंबई पोलिसांनी जप्त केले आहेत. थर्टी फर्स्टच्या पार्श्वभूमीवर करण्यात आलेली ही मोठी कारवाई आहे. मेफोड्रॉन (एमडी) प्रकारातल्या या अंमलीपदार्थाची किंमत सुमारे ६० लाख रुपये असल्याचे पोलीस सुत्रांकडून सांगण्यात येत आहे. याप्रकरणी दोन जणांना ताब्यात घेण्यात आले असून त्यांना ४ जानेवारीपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.


मुंबईसह देशभरात थर्टीफर्स्ट आणि नववर्षाचे सेलिब्रेशन धुमधडाक्यात साजरे होत आहे. बहुतांश ठिकाणच्या पार्ट्यांमध्ये मांसाहारासह मद्य चिरवले जात आहे. मात्र, मुंबईसारख्या महानगरांत अंमलीपदार्थांच्या तस्करी करणाऱ्या अनेक टोळ्या छुप्या पद्धतीने काम करीत असल्याचे आजच्या कारवाईमुळे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे.

या पार्ट्यांदरम्यान, कोणतेही अनुचित प्रकार घडू नयेत यासाठी पोलिसांना सतर्कतेचे आदेश देण्यात आले आहेत. मुंबई-पुण्यासारख्या मोठ्या शहरांमध्ये ठिकठिकाणी पोलिसांची तपासणी मोहिम सुरु असून मद्यपी वाहनचालकांवर गुन्हे दाखल केले जात आहेत.

दरम्यान, लोक सध्या थर्टीफर्स्टच्या पार्ट्यांमध्ये मग्न आहेत. त्यानंतर मध्यरात्री बारा वाजल्यानंतर पहाटेपर्यंत संगीत पार्ट्यादेखील सुरु होतील. जगभरात नववर्षाचे सेलिब्रेशन सुरु झाले असून ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड येथे सर्वप्रथम फटाक्यांच्या आतषबाजीसह सेलिब्रेशनला सुरुवात झाली आहे. त्यानंतर हाँगकाँग, जपान, उत्तर कोरिया, चीनमध्ये आकर्षक आतषबाजीसह नववर्षाचे स्वागत केले जात आहे.