माझगावमध्ये चांदणी चौकापेक्षाही अधिक प्रदूषण

मुंबई : शहरातील हवेची गुणवत्ता ढासळण्याचे सत्र बुधवारीदेखील सुरू राहिल्याची नोंद ‘सफर’ या प्रदूषण मापक यंत्रणेने केली. माझगाव परिसरातील हवा प्रदूषणाचा निर्देशांक (एअर क्वालिटी इण्डेक्स-एक्यूआय) बुधवारी दिल्लीच्या चांदणी चौकातील हवेच्या गुणवत्तेपेक्षाही खालावल्याची नोंद करण्यात आली. या वेळी या विभागातील हवा गुणवत्तेचा निर्देशांक ४३२ नोंदविण्यात आला. सध्या रात्रीच्या तापमानात घट होत असल्याने पुढील आठवडाभर हवेची गुणवत्ता ढासळत राहण्याची शक्यता आहे.

दिवाळीनंतर पुन्हा एकदा शहरातील हवेची गुणवत्ता ढासळण्यास सुरुवात झाली आहे. हवेची गुणवत्ता ढासळण्याचे सत्र सोमवारपासून सुरू झाले होते. ‘सफर’च्या नोंदींत मंगळवारी मुंबईतील सर्वसाधारण हवेच्या गुणवत्तेचा निर्देशांक २०७, तर बुधवारी २४१ होता. माझगाव विभागातील हवेची गुणवत्ता ‘धोकादायक’ पातळीपर्यंत खालावल्याची नोंद बुधवारी करण्यात आली. या वेळी दिल्लीतील प्रसिद्ध आणि प्रदूषित चांदणी चौकातील हवेच्या गुणवत्तेचा निर्देशांक ३७१ होता, तर माझगाव विभागातील निर्देशांक ४३२ नोंदविण्यात आला. यापाठोपाठ अंधेरी आणि मालाड विभागाचा निर्देशांक ३७० आणि ३४१ नोंदवला गेला. त्यामुळे मुंबईतील काही विभागांतील हवेची गुणवत्ता दिल्लीप्रमाणेच ढासळल्याचे चित्र दिसत आहे.

शहरातील हवेच्या गुणवत्तेत दिवसभरात चढउतार होत आहेत. सकाळी मोठय़ा प्रमाणात ढासळलेला हवेचा दर्जा दुपारनंतर स्थिरावतो. त्यानंतर सायंकाळी पुन्हा गुणवत्तेत घट होत असल्याचे सफरच्या आकडेवारीतून समोर येत आहे. शहरातील रात्रीच्या तापमानात घट होत आहे. गारवा वाढल्यावर हवेची घनता वाढते. त्यामुळे प्रदूषके जमिनीलगतच राहतात. रात्री गारवा अधिक असल्यामुळे रात्रीपासून दुपापर्यंत प्रदूषण अधिक असते. त्यानंतर ते काही काळ स्थिरावते आणि हवेची गुणवत्ता रात्री पुन्हा ढासळत जाते. पुढील काही काळ हे सत्र असेच सुरू राहण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.