सीएसटी-पनवेल उन्नत मार्गावर नवीन स्थानक

मुंबईतील रेल्वे वाहतूक यंत्रणेत आमूलाग्र बदल घडवून आणण्याची क्षमता असलेल्या सीएसटी-पनवेल उन्नत रेल्वेमार्ग प्रकल्पावर एका नव्या स्थानकाची भर पडणार आहे. हा रेल्वेमार्ग पोर्ट ट्रस्टच्या जागेतून जाणार असून हा भूखंड रेल्वेच्या प्रकल्पासाठी उपलब्ध करून देण्यास मुंबई पोर्ट ट्रस्टने तत्त्वत: मान्यता दिली आहे. मात्र त्या बदल्यात या जागेवर मुंबई पोर्ट ट्रस्ट हे नवीन स्थानक उभे राहणार आहे. या स्थानकाचा खर्च कोणी करायचा, याचा निर्णय अद्याप झालेला नाही.

मुंबई पोर्ट ट्रस्टच्या जमिनीच्या पुनर्विकास योजनेत मोकळी जागा, जलक्रीडा, मनोरंजनपर गोष्टी आदींचा समावेश आहे. भविष्यात या ठिकाणी पर्यटकांना मनोरंजनासाठी अनेक गोष्टी उपलब्ध असतील. त्यामुळे येथे पर्यटक मोठय़ा प्रमाणात भेट देतील. हीच बाब लक्षात घेऊन मुंबई पोर्ट ट्रस्टने येथे स्थानक असावे, अशी इच्छा व्यक्त केली आहे.

हे स्थानक इंडिया डॉक्सच्या जवळ उभे राहण्याची शक्यता आहे. मुंबई रेल्वे विकास महामंडळातर्फे (एमआरव्हीसी) उभारण्यात येणाऱ्या या प्रकल्पाची लांबी ४७ किलोमीटर एवढी आहे. या मार्गावर ११ स्थानकांचे नियोजन होते.

प्रस्तावित स्थानके

सीएसटी, मुंबई पोर्ट ट्रस्ट, वडाळा, कुर्ला, चेंबूर, वाशी, नेरूळ, बेलापूर, खारघर, पनवेल, नवी मुंबई विमानतळ.