पैशांच्या बदल्यात जमीन देण्यास राजी

संजय बापट, मुंबई</strong>

वडाळा ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) मेट्रो मार्ग-११ प्रकल्पातील शिवडी ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस दरम्यानच्या भूमिगत मेट्रोच्या खर्चाचा भार उचलण्याची मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाची मागणी मुंबई पोर्ट ट्रस्ट(बीपीटी)ने मान्य केली आहे.

मात्र भुयारी मेट्रोचा खर्चभार उचलताना प्राधिकरणास पैशांऐवजी तेवढय़ा किमतीची जमीन देण्याची तयारी ट्रस्टने दाखविली आहे. त्यामुळे या  मेट्रोचा मार्ग सुकर झाल्याची माहिती एमएमआरडीएतील सूत्रांनी दिली.   कासारवडवली- ठाणे ते वडाळा दरम्यानच्या मेट्रो मार्ग- ४ चा विस्तार थेट छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसपर्यंत करण्यात येणार असून सन २०२६ मध्ये हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर या मेट्रोतून दररोज ११ लाख ६० हजार प्रवासी वापर करतील असा अंदाज आहे. मेट्रो-४ चे काम सुरू झाले असून वडाळा ते छत्रपती शिवाजी महाराज दरम्यानच्या मेट्रो-११ प्रकल्पासही गेल्याच आठवडय़ात मंत्रिमंडळाने मान्यता दिली आहे. या मार्गाची एकूण लांबी १२.७७४ किलोमीटर आहे.  त्यामध्ये भुयारी मेट्रो मार्गाचा खर्च १८२९ कोटी आहे.

या मेट्रो मार्गाचा फायदा मुख्यत्वाने मुंबई पोर्ट ट्रस्टतर्फे पुनर्विकसित होणाऱ्या क्षेत्राला होणार आहे.  या प्रकल्पाच्या खर्चाचा भार कोणी उचलायचा यावरून एमएमआरडीए आणि मुंबई पोर्ट ट्रस्ट यांच्यात गेल्या काही महिन्यांपासून निर्माण झालेला तिढा  सुटला आहे. पोर्ट ट्रस्टचे अध्यक्ष संजय भाटिया आणि प्राधिकरणाचे महानगर आयुक्त आर. ए. राजीव यांच्यात झालेल्या चर्चेअंती भूमिगत मेट्रोच्या वाढीव खर्चाचा भार उचलण्याची तयारी पोर्ट ट्रस्टने दाखविली आहे. मात्र ही रक्कम थेट देण्याऐवजी तेवढय़ा किमतीची जागा एमएमआरडीएला देण्याची तयारी भाटिया यांनी दाखविली असून तसे पत्रही प्राधिकरणास पाठविले असल्याचे सूत्रांनी सांगितले. आता प्रकल्पाचे काम गतिमान होईल असा दावाही सूत्रांनी केला. याबाबत महानगर आयुक्त आर. ए. राजीव यांच्याशी संपर्क साधला असता, भूमिगत मेट्रोच्या वाढीव खर्चाचा भार उचलण्याचे मुंबई पोर्ट ट्रस्टने मान्य केले असून या निधीच्या किमतीची जागा देण्याबाबतचे पत्र त्यांनी दिल्याचे राजीव यांनी सांगितले.