मुंबईतील कुर्ला भागात इमारतीचा भाग कोसळला आहे. या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. कुर्ला स्टेशन रोड भागात मुंबई महापालिकेच्या एल विभागाच्या कार्यालयला लागूनच नेताब ही तीन मजली जुनी इमारत होती. ज्या इमारतीचा भाग कोसळला. ही इमारत पालिकेने अतिधोकादायक म्हणून घोषित केली होती. तरीही काही कुटुंबं या इमारतीत वास्तव्य करत होती. आज दुपारी १२ च्या सुमारास मुंबई आणि उपनगरांमध्ये पाऊस सुरु झाला. त्यावेळी या इमारतीचा काही भाग कोसळला.

दरम्यान इमारतीचा भाग कोसळल्याची माहिती मिळताच अग्निशमन दल, मुंबई महापालिकेचे आपत्कालीन व्यवस्था अधिकारी आणि पोलीस या ठिकाणी गेले. ही इमारत रिकामी करण्याचे काम सुरु आहे. इमारतीत राहणाऱ्या कुटुंबांना सुरक्षित स्थळी हलवण्याचे कामही सुरु आहे. इमारतीचा जो भाग कोसळला त्या ठिकाणी कुणीही वास्तव्य करत नव्हते. सध्या आम्ही तिथे मदत आणि बचावकार्य सुरु केलं आहे अशी माहितीही महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे.