देशाच्या आर्थिक राजधानीला तीन तारांकन मिळण्याची शक्यता

प्रसाद रावकर, मुंबई</strong>

स्वच्छता, कचरा वर्गीकरण आणि कचऱ्यापासून खतनिर्मिती याबाबत मुंबईकरांची उदासीनता आणि घराघरांतून, वस्त्यांमधून कचरा गोळा करण्यात अपयशी ठरलेली पालिका यामुळे ‘स्वच्छ भारत अभियाना’मध्ये मुंबईला तीन तारांकित शहरांच्या पंक्तीत बसावे लागण्याची चिन्हे आहेत. गेल्या वर्षी राज्यांच्या राजधान्यांमध्ये मुंबईने आघाडीचे स्थान मिळविले होते. परंतु, मुंबईची यंदा ‘स्वच्छ भारत अभियाना’त घसरगुंडी उडण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘स्वच्छ भारत अभियाना’ची हाक देताच अवघ्या भारतभरात स्वच्छता मोहीम सुरू झाली. या अभियानाअंतर्गत स्वच्छतेबाबत घेण्यात येणाऱ्या स्पर्धेत शहराचा क्रमांक घसरू नये म्हणून स्थानिक स्वराज्य संस्था निरनिराळे उपक्रम राबवीत आहेत. आता केंद्र सरकारने काही निकष निश्चित करून आपले शहर कोणत्या स्थानावर आहे ते कळविण्याची सूचना संबंधित स्थानिक स्वराज्य संस्थांना केली आहे. या निकषांनुसार एक ते सात दरम्यान तारांकन (स्टार) केले जाणार आहे. आपले शहर टक्केवारीनुसार कोणत्या तारांकित शहरामध्ये बसते याची माहिती स्थानिक स्वराज्य संस्थांनी येत्या ४ जानेवारीपर्यंत केंद्राला कळवायची आहे. ही माहिती सादर केल्यानंतर केंद्र पातळीवर त्याची पडताळणी करून ‘स्वच्छते’मधील शहरांचे स्थान निश्चित करण्यात येणार आहे. परंतु या सगळ्यास निकषांवर मुंबई मार खाणार आहे. जेमतेम तीन तारांकित शहरांच्या यादीत मुंबईला स्थान मिळण्याची शक्यता आहे. मात्र त्यातही काही निकष पूर्ततेबाबत पालिकेला कसोशीने प्रयत्न करावे लागणार आहेत. परंतु मुंबईकरांच्या सहकार्याअभावी त्यात यश मिळणे अवघड आहे.

निकष काय?

किती घरांमधून कचरा गोळा केला जातो, कचरा निर्माण होतो तेथे त्याचे किती प्रमाणात वर्गीकरण करण्यात येते, किती क्षमतेच्या कचराकुंडय़ा वापरल्या जातात, किती कचऱ्यावर प्रक्रिया केली जाते, नागरिकांच्या समस्या किती प्रमाणात सोडविण्यात येतात, निवासी आणि व्यावसायिक क्षेत्रात दिवसातून किती वेळा स्वच्छता करण्यात येते, कचरा साठवणूक आदी निकष निश्चित करण्यात आले आहेत. प्रत्येक निकषासाठी टक्केवारी निश्चित करण्यात आली आहे.

कारवाईत शिथिलता

नव्या वर्षांमध्ये लोकसभेची निवडणूक होत आहे. या पाश्र्वभूमीवर मुंबईमधील स्वच्छतेबाबत शिथिलता आल्याचे दिसून येत आहे. सोसायटय़ांना ओल्या कचऱ्यापासून खतनिर्मिती करण्याची सक्ती करण्यात आली होती. याबाबत पालिकेने सुरुवातीला कडक धोरण अवलंबिले होते. कचऱ्यापासून खतनिर्मिती करण्यास टाळाटाळ करणाऱ्या सोसायटय़ांवर नोटीस बजावण्यात आली. त्यानंतर दंडात्मक कारवाईचा बडगा उगारण्यात आला. आजही बहुतांश सोसायटय़ांनी आपल्या कचऱ्यापासून खतनिर्मिती करण्याचे टाळले आहे.

निकषानुसार दिल्या जाणऱ्या टक्केवारीचे तारांकन

निकष                         एक    दोन        तीन    चार    पाच    सहा    सात

घराघरातून कचरा        ६०%   ८०%   १००%     –          –        –          –

गोळा करणे

कचरा वर्गीकरण            २५%   ५०%   ८०%   १००%       –       –         –

कचराकुंडय़ा                   २५%   ५०%   ८०%   १००%

कचऱ्यावर प्रक्रिया          २५%   ५०%   ७५%   १००%

केंद्र सरकारने एक ते सात तारांकित शहरांचे निकष जाहीर केले आहेत. कचरा वर्गीकरण, खतनिर्मिती, दिवसातून किती वेळा सफाई केली जाते आदी निकषांचा त्यात समावेश आहे. त्यानुसार मुंबईचे स्थान निश्चित करण्यात येणार आहे.

– किरण दिघावकर, साहाय्यक आयुक्त, ‘स्वच्छ भारत अभियान’