मुंबई पोलिसांनी वेळीच दाखवलेल्या संयम आणि प्रसंगावधानामुळे एका ब्रिटीश नागरिकाचा जीव वाचला आहे. २७ जून रोजी पवई पोलिसांना कंट्रोल रुमकडून एक ब्रिटीश नागरिक हिरानंदानी भागातील टोराने इमारतीच्या २१ व्या मजल्यावरुन आत्महत्या करण्याचा प्रयत्न करत असल्याची माहिती देण्यात आली होती. यानंतर पवई पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली.

पोलीस घटनास्थळी पोहोचले तेव्हा संबंधित नागरिक अॅव्हलॉन इमारतीच्या ३३ व्या मजल्यावर राहत असल्याची माहिती मिळाली. हा फ्लॅट आतमधून लॉक होता. पोलिसांनी बराच वेळ समजून घातल्यानंतर ब्रिटीश नागरिकाने दरवाजा उघडला. या व्यक्तीचं नाव सॅम कोलार्ड असून ते ६१ वर्षीय आहेत. या फ्लॅटमध्ये ते एकटे राहत होते. त्यांना पक्षाघाताचा झटका येऊन गेला आहेत. ते एका अमेरिकन कंपनीत काम करतात. अंधेरीमध्ये त्यांचं कार्यालय आहे.

सॅम यांनी ऑस्ट्रेलियात राहणाऱ्या आपल्या पत्नीला फोन करुन आत्महत्या करत असल्याचं सांगितलं होतं. यानंतर त्यांच्या पत्नीने प्रसंगावधान दाखवत तात्काळ बीकेसमधील ब्रिटीश उच्चायुक्तांच्या कार्यालयाशी संपर्क साधला. तेथील अधिकाऱ्यांनी ही माहिती स्थानिक पोलिसांना दिली.

कागदांची छाननी केली असता सॅम हिरानंदानी रुग्णालयातील न्यूरोलॉजिस्टकडून उपचार घेत असल्याचं समोर आलं. पोलिसांनी रुग्णवाहिका बोलावली होती. पण ब्रिटीश नागरिक रुग्णवाहिकेत बसण्यास तयार होत नव्हते. ते प्रचंड हिंसक होत होते. पण पोलिसांनी जवळपास दीड तास शांतपणे त्यांच्याशी चर्चा करुन शांत केलं. यानंतर ते पोलिसांच्या गाडीतून रुग्णालयात जाण्यास तयार झाले. तिथे त्यांची तपासणी करुन दाखल करण्यात आलं.

यानंतर ब्रिटीश उच्च आयुक्तालयाच्या कॉन्सुलरने रुग्णालयात त्यांची भेट घेतली. त्यांचा मुलगाही युकेहून आला आहे. वेळीच प्रसंगावधान दाखवत सॅम यांचा जीव वाचवल्याबद्दल पवई पोलिसांचे आभार मानण्यात आले असून त्यांचंही कौतुकही करण्यात आलं आहे.