वीज पुरवठा करणारा ग्रीड बंद पडल्यानं मुंबई, ठाणे, नवी मुंबईसह अनेक ठिकाणचा वीज पुरवठा खंडित झाला आहे. सोमवारी सकाळी अचानक वीज पुरवठा खंडित झाला. याचा परिणाम मुंबईची जीवनवाहिनी असलेल्या लोकलवरही झाला आहे. आठवड्याच्या पहिल्याच दिवशी वीज पुरवठा खंडित झाल्यानं लोकलचा खोळंबा झाला आहे.

सोमवारी सकाळी दहा साडेदहा वाजेच्या दरम्यान मुंबई, ठाणे, नवी मुंबईसह अनेक भागातील वीज पुरवठा अचानक खंडित झाला. आठवड्याचा पहिलाच दिवस असल्यानं आणि अचानक वीज पुरवठा खंडित झाल्यानं अनेकांचा कामाचा खोळंबा झाला. टाटाकडून करण्यात येणाऱ्या विद्युत पुरवठ्यात बिघाड झाल्यानं वीज पुरवठा खंडित झाल्याचं बेस्ट म्हटलं आहे. मात्र, याचा फटका मुंबईतील लोकल सेवेलाही बसला आहे.


वीज पुरवठा बंद झाल्यानंतर लोकल सेवाही ठप्प झाली आहे. ग्रीड बंद पडल्यानं मुंबईतील लोकल सेवेत व्यत्यय आल्याची माहिती मध्य रेल्वेच्या जनसंपर्क अधिकाऱ्यांनी दिली आहे. लोकल बंद झाल्यानं कामासाठी घराबाहेर पडलेल्या मुंबईकरांचे पुन्हा हाल होत आहेत. अनेक प्रवाशांना लोकलमधून उतरून पायीच जवळचे रेल्वे स्टेशन गाठवे लागले.