News Flash

Mumbai Blackout : “…तर राज्याने हा विषय केंद्र सरकार समोर का मांडला नाही?”

"जनतेचे लक्ष अन्यत्र वळवण्यासाठी चीनवर सायबर हल्ल्याचा आरोप"

संग्रहित छायाचित्र/इंडियन एक्स्प्रेस

“स्वत:चे अपयश झाकण्यासाठी महाविकास आघाडी सरकार चीनच्या सायबर हल्ल्यामुळे मुंबई काळोखात बुडाल्याच्या कपोलकल्पित बातम्या पसरवून जनतेला मूर्ख बनवण्याचा प्रयत्न करत आहेत. १२ ऑक्टोबर २०२० रोजी संपूर्ण मुंबई काळोखात बुडाली ती केवळ ऊर्जाखात्यातील अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष आणि समन्वयाच्या अभावामुळे. मात्र, हे अपयश झाकण्यासाठी गृहमंत्र्यांनी आणि ऊर्जामंत्र्यांनी नवीन शक्कल लढवत आहेत,” असा आरोप राज्याचे माजी ऊर्जामंत्री आणि भाजपा नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी मंगळवारी केला. नागपूर येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

आणखी वाचा- मुंबई बत्तीगुल प्रकरण : गृहविभागाला दिलेल्या अहवालात सायबर सेलचे ३ गंभीर खुलासे!

महाराष्ट्राच्या वीजपुरवठा यंत्रणेचे संचालन आणि नियंत्रण करणाऱ्या संगणक यंत्रणेत (स्काडा) परदेशातून सायबर घुसखोरी झाल्याने गेल्यावर्षी १२ ऑक्टोबर रोजी मुंबईचा वीजपुरवठा बंद पडला होता, असं राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सायबर पोलिसांच्या तपासाचा हवाला देत म्हटलं होतं. यावरून माजी ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी ऊर्जामंत्री नितीन राऊत यांच्यासह अनिल देशमुख यांच्यावर निशाणा साधला. बावनकुळे म्हणाले ,”१२ ऑक्टोबर २०२० रोजी संपूर्ण मुंबई काळोखात बुडाली, ती केवळ ऊर्जाखात्यातील अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष आणि समन्वयाच्या अभावामुळे. मात्र, हे अपयश झाकण्यासाठी गृहमंत्र्यांनी आणि ऊर्जामंत्र्यांनी नवीन शक्कल लढवत चीनच्या सायबर हल्ल्याचे कारण देत जनतेची दिशाभूल करणे सुरू केली आहे. एका वृत्ताच्या आधारावर एखादा आयपीएस अधिकारी अहवाल तयार करतो. त्यामध्ये आंतरराष्ट्रीय हस्तक्षेप असल्याचे नमूद करतात. अशा महत्त्वाच्या अहवालाची कोणतीही खातरजमा न करता राज्याचे गृहमंत्री थेट पत्रकार परिषद घेऊन आपली जबाबदारी झटकताहेत, हे अत्यंत गंभीर आहे. जर या घटनेत एखाद्या देशाचा संबंध असेल तर राज्याने हा विषय केंद्र सरकार समोर का मांडला नाही? परराष्ट्र खाते आणि संरक्षण खात्यासमोर हा विषय मांडणे राज्य सरकारला महत्त्वाचे वाटले नाही, याचे आश्चर्य वाटते,” अशी टीका बावनकुळे यांनी केली.

आणखी वाचा- “मुंबईतील ‘बत्तीगुल’मागे चीन असल्याच्या दाव्यात तथ्य”, ऊर्जा मंत्र्यांचं मोठं विधान!

“१२ ऑक्टोबरपूर्वी मुंबईला वीज पुरवठा करणाऱ्या चार वाहिन्यांपैकी दोन वाहिन्या बंद पडल्या होत्या. त्यामुळे सगळा भार हा कळवा-पडघा या तिसऱ्या वाहिनीवर येऊन ती वाहिनी १२ ऑक्टोबरला सकाळी बंद पडली आणि त्यानंतर चौथी वाहिनी ही खारघर येथील ऑपरेटर्सकडून स्वत:हून बंद करण्यात आली. अधिकाऱ्यांनी वेळोवेळी दुरूस्तीचे काम केले नाही. समन्वयाचा अभाव असल्यामुळे मुंबई काळोखात बुडाली हे सत्य आहे. जनतेला १०० युनिट पर्यंतची मोफत वीज देण्याचे आश्वासन पूर्ण न करणे, भरमसाठ वीज बिल रद्द करण्याचे आश्वासन पूर्ण न करणे, कनेक्शन खंडित करण्याच्या नोटिसांमुळे संतप्त झालेली जनता, यातून जनतेचे लक्ष अन्यत्र वळवण्यासाठी चीनवर सायबर हल्ल्याचा आरोप करून जनतेची फसवणूक करून नामानिराळे राहण्याचा प्रयत्न महाविकासआघाडी सरकारकडून होत आहे. आम्ही याचा तीव्र निषेध करतो,” असं म्हणत बावनकुळे यांनी नितीन राऊत आणि अनिल देशमुख यांच्यावर टीका केली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 2, 2021 3:56 pm

Web Title: mumbai power outage mumbai blackout chandrashekhar bawankule criticised nitin raut and anil deshmukh bmh 90
Next Stories
1 मोबाइलसाठी तरुणीवर जीवघेणा हल्ला; कॉटन ग्रीन-शिवडी स्थानकादरम्यान धक्कादायक घटना
2 मुंबईकरांनो, ‘या’ रेल्वे स्थानकांवर जाण्याआधी विचार करा; प्लॅटफॉर्म तिकीटात पाचपटीने वाढ
3 फडणवीस म्हणतात, “हे सरकार मला नारायण भंडारीसारखं वाटतंय!”
Just Now!
X