15 July 2020

News Flash

Cyclone Nisarga : आता झुंज वादळाशी..

मैदानांमध्ये उभारलेली करोना केंद्रे रिकामी करण्याची वेळ

करोनाशी झगडत असलेल्या मुंबईकरांसमोर नवे संकट; मैदानांमध्ये उभारलेली करोना केंद्रे रिकामी करण्याची वेळ

मुंबई : गेल्या दोन महिन्यांपासून करोना विषाणूच्या संकटाला तोंड देत असलेल्या मुंबईकरांना आता चक्रीवादळाच्या संकटाला सामोरे जावे लागत आहे. हवामान खात्याने दिलेल्या चक्रीवादळाच्या इशाऱ्याच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील सर्व आपत्कालीन यंत्रणा सज्ज करण्यात आल्या आहेत. तसेच करोना रुग्णांच्या उपचारासाठी शहरातील मोकळय़ा मैदानांत उभारण्यात आलेली करोना केंद्रे बंद करावी लागली असून येथील रुग्णांना मंगळवारी अन्यत्र हलवण्यात आले. वांद्रे कुर्ला संकुलातील करोना केंद्रातील २४५ रुग्णांना हलवताना पालिका कर्मचाऱ्यांची चांगलीच दमछाक झाली.

‘निसर्ग’ चक्रीवादळ ३ जूनला बुधवारी अलिबागच्या जवळ धडकण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. तसेच त्या काळात ताशी १०० ते १२० किमी वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे. चक्रीवादळामुळे मुंबईच्या किनारपट्टीवर जोरदार वारे वाहण्याची शक्यता आहे. मैदानांमध्ये उभारण्यात आलेल्या तात्पुरत्या समर्पित करोना आरोग्य केंद्रांना या वादळाचा फटका बसण्याची शक्यता आहे. म्हणून या केंद्रांची फेरतपासणी करण्याचे आदेश पालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी संबंधित कंत्राटदारांना दिले. सोसाटय़ाचे वारे वाहण्याची शक्यता लक्षात घेऊन केंद्रांतील रुग्णांना आवश्यकतेनुसार पक्क्य़ा ठिकाणी हलवावे, असे निर्देशही त्यांनी पालिका अधिकाऱ्यांना दिले.

वांद्रे-कुर्ला संकुल परिसरातील मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकारणाच्या मैदानात उभारण्यात आलेले हजार खाटांचे तात्पुरते रुग्णालय वादळामुळे कोलमडण्याची शक्यता आहे. त्यामुळे येथे दाखल असलेल्या २४५ रुग्णांना मंगळवारी दिवसभरात वरळी येथील एनएससीआय संकुलात पाठविण्यात आले. गेल्याच आठवडय़ात येथे रुग्ण दाखल होण्यास सुरुवात झाली होती. दीडशे रुग्णांना एकाच दिवसात हलविताना येथील प्रशासनाची चांगलीच कसरत झाली. इथून का हलवीत आहे, याची उत्तरे रुग्णांना देताना चांगलीच दमछाक होत होती. काही रुग्णांनी तर आम्हाला इथूनच घरी सोडण्याचा धोशा लावला. या रुग्णांना नेण्यासाठी बेस्टच्या बस मागविल्या होत्या. ऑक्सिजनवर असलेल्या रुग्णांना रुग्णवाहिकेतून पाठविले. संध्याकाळी उशिरापर्यंत ही प्रक्रिया सुरू होती.

नागरिकांना आवाहन

’ मुंबईकरांनी विनाकारण घराबाहेर पडू नये.

’ समुद्रकिनाऱ्यांवर फिरायला जावू नये.

’ घराच्या बाल्कनीत लटकणाऱ्या वस्तू काढाव्यात.

’ कुंडय़ा, कार्डबोर्ड बॉक्स, काचेची तावदाने सैल नाहीत, याची तपासणी करावी.

’ दुचाकी वाहने नीट स्टॅण्डवर उभी करून ठेवावी.

’ वीज जाण्याची शक्यता असल्यामुळे मोबाइल फोन चार्ज करून ठेवावे.

श्बाल्कनीतील डिश एण्टेना, वातानुकूलित यंत्रणेचे बाहेरच्या बाजूस असलेले यंत्र मजबुतीने लावल्या आहेत की नाही याची तपासणी करा.

अग्निशमन दल सज्ज

कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी गिरगाव, दादर, जुहू, वर्सोवा, आक्सा, गोराई समुद्रकिनाऱ्यांवर अग्निशमन दलाने ९३ जीवरक्षकांना सज्ज ठेवले आहे. आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांच्या मदतीसाठी आपल्या ३५ अग्निशमन केंद्रांना सतर्क राहण्याचे आदेशही देण्यात आले आहेत. हे जीवरक्षक दोन पाळ्यांमध्ये काम करतील. त्यांना बोट, कयाक, जेटस्की, लाइफ जॅकेट, रेस्क्यू टय़ूब, टॉर्च, फ्लोटिंग स्ट्रेचर आदी उपलब्ध करण्यात आले आहे. तसेच, इमारत कोसळणे, आग लागणे, झाड उन्मळून पडणे अथवा अन्य कोणतीही दुर्घटना घडल्यास नागरिकांना मदत करता यावी यासाठी मुंबईमधील ३५ अग्निशमन केंद्रांना सज्ज राहण्याची सूचना करण्यात आली आहे.

वेगवान वाऱ्यांना तोंड देण्याची क्षमता

वांद्रे-कुर्ला संकुलात बांधलेल्या तात्पुरत्या कोव्हिड सुविधा केंद्रांची चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर विशेष दक्षता घेण्यात येत असल्याचे एमएमआरडीएने सांगितले. रुग्णांना अन्यत्र हलवले असले तरी केंद्राला चक्रीवादळात धोका पोचू नये यासाठी उपाययोजना करण्यात आल्या आहे. प्लायवूड, विशेष पीव्हीसी आच्छादन अशा साधनांचा यामध्ये वापर केला आहे. ताशी ८० किमी वेगाने वाहणाऱ्या वाऱ्यामध्ये टिकून राहण्याची या सुविधेची क्षमता असल्याचे एमएमआरडीएने सांगितले. सावधगिरी म्हणून सुविधा केंद्राच्या खाबांचे मजबुतीकरण, प्लायवूडच्या फ्लोअरिंगवर वजन वाढवण्यासाठी वाळूच्या बॅगा ठेवणे असे उपाय करण्यात येत आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 3, 2020 2:02 am

Web Title: mumbai preparing evacuation rescue and relief plans ahead of cyclonic storm zws 70
Next Stories
1 ४८.५४ लाख मुंबईकरांवरील निर्बंध कायम
2 डॉक्टरांना जेवण पुरविणाऱ्या डबेवाल्याचा करोनाने मृत्यू
3 स्वयंसेवी संस्थांना निधीचा तुटवडा
Just Now!
X