देवयानी खोब्रागडे प्रकरणात अमेरिका माफी मागत नाही तोपर्यंत अमेरिकी उत्पादनांवर बंदी घालण्याचे आवाहन रिपब्लिकन पक्षाचे नेते रामदास आठवले यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत केले. ओबामांना जसा वंशभेदाचा अनुभव आहे त्याप्रमाणेच आमची ही चळवळ आहे, अशी मल्लिनाथीही त्यांनी केली. त्यापाठोपाठ संतप्त रिपब्लिकन कार्यकर्त्यांनी वांद्रे येथील डॉमिनोज दुकानात शिरून सामानाची नासधूस केली.
देवयानी प्रकरणी पक्षाची भूमिका स्पष्ट करण्यासाठी रामदास आठवले यांनी शुक्रवारी पत्रकार परिषद घेतली. अमेरिकी उत्पादनावर बंदी घालण्याचे आवाहन त्यांनी केले. तसेच अमेरिकी चित्रपटही बंद पाडण्याचा इशारा दिला. या आवाहनानंतर लगेचच दुपारी १ वाजता रिपब्लिकन कार्यकर्ते वांद्रे येथील जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ असलेल्या डॉमिनोज दुकानात शिरले आणि त्यांनी तेथील मोटारसायकली पाडल्या, तसेच काचा फोडल्या. कार्यकर्त्यांंची ही उत्स्फूर्त प्रतिक्रिया असून,भावना दुखावल्या म्हणून हे कृत्य केल्याचे आठवले यांनी सांगितले. मात्र त्यांनी गिऱ्हाईकांना कोणतीही इजा केली नसल्याचे ते म्हणाले.
अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांना ई-मेल पाठवून या प्रकरणी लक्ष घालण्याचे आवाहन केल्याची माहिती त्यांनी  या वेळी दिली.