मुंबईत प्रवास करताना अनेकदा स्वच्छतागृह नेमके कोठे आहे, हे शोधण्यात प्रवाशांचा वेळ खर्ची होतो. यात सर्वाधिक त्रास होतो तो महिलांना. पण, लवकरच त्यांची या त्रासातून मुक्तता होणार असून आपण असलेल्या ठिकाणापासून किती अंतरावर स्वच्छतागृह आहे, ते कोणत्या अवस्थेत आहे, याचा तपशील मोबाइलच्या एका क्लिकवर उपलब्ध होणार आहे. डॉन बॉस्को तंत्रज्ञान संस्थेतील विद्यार्थी, आयआयटी, राइट टू पी, आवाज फाऊंडेशन, कोरो या संस्थांनी मिळून एक अ‍ॅप विकसित करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.

अभिनव संकल्पना कुर्ला येथील डॉन बॉस्को तंत्रज्ञान संस्थेतील जोएल बडीगर, जेनिफर जॉन्सन, मेलिशा डिसूझा आदी विद्यार्थ्यांनी मांडली. त्यांच्या या संकल्पनेला संस्थेतील प्राध्यापक अमिया त्रिपाठी आणि आयआयटीमधील संशोधकांनी जितेंद्र शाह यांनी साथ दिली. ही संकल्पना पुढे घेऊन जाण्यासाठी त्यांनी ‘राइट टू पी’ आंदोलनाच्या सुप्रिया सोनार आणि ‘आवाज फाऊंडेशन’च्या सुमायरा अब्दुलअली यांनीही मदत केली. या विद्यार्थ्यांनी एक ते दीड महिना मेहनत घेऊन या विषयावर तयार केलेला प्रबंध शनिवारी भांडुप येथे पार पडलेल्या ‘एनहान्सिंग एम्प्लॉयबिलिटी बाय एज्युकेशनल रीस्ट्रक्चरिंग अ‍ॅण्ड टेक्नॉलॉजिकल अपग्रेडेशन’ या विषयावर पार पडलेल्या आंतराराष्ट्रीय परिषदेत सादर केला. येथे या प्रबंधाला प्रथम पारितोषिक देऊन गौरविण्यात आले.  अभियांत्रिकी शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना सामाजिक समस्यांवर उत्तर शोधण्यास प्रवृत्त करत असल्याचे डॉन बॉस्को तंत्रज्ञान संस्थेतील प्राध्यापक अमिया त्रिपाठी यांनी स्पष्ट केले.

असे असेल अ‍ॅप

विद्यार्थ्यांचा हा प्रबंध प्रत्यक्षात आणण्यासाठी आयआयटीमधील भौगोलिक माहिती प्रणाली (जीआयएस) प्रयोगशाळेत काम करणारे संशोधक जितेंद्र शाह यांनी पुढाकार घेतला आहे. या अ‍ॅपमध्ये ओपनमॅप प्रणालीत उपलब्ध असलेल्या नकाशांचा वापर करण्यात आला आहे. त्यात सध्याच्या शहर नियोजन आराखडय़ांची मदत घेऊन शहरातील स्वच्छतागृहांची नोंद करण्यात येणार आहे. याचबरोबर स्वच्छतागृहात आवश्यक सोयीसुविधांची यादीही यामध्ये अद्ययावत करण्यात येणार आहे. ही माहिती थेट लोकांकडून भरून घेतली जाणार आहे. यासाठी शहरातील स्वच्छतागृहांमध्ये जाऊन लोक पाहणी करणार असून त्याची खरी माहिती या नकाशावर अद्ययावत केली जाणार आहे. यासाठी मोबाइलमधील भूस्थान निश्चित प्रणालीचा वापर केला जाणार असल्याचे शाह यांनी स्पष्ट केले. ही माहिती संकलित झाल्यावर ती अ‍ॅपवर अद्ययावत केली जाईल. यामुळे या अ‍ॅपच्या माध्यमातून आपण असलेल्या भागात स्वच्छतागृहे कुठे आहेत, याचा तपशील मिळणे शक्य होणार आहे. याचबरोबर त्यांनी वापरलेल्या स्वच्छतागृहांची अ‍ॅपमध्ये देण्यात आलेली माहिती प्रत्यक्ष स्थितीशी जुळणारी नसेल तर ती सुधारण्याची सोयही या अ‍ॅपमध्ये देण्यात आली आहे. कोणत्याही स्वछतागृहाबाबत तक्रार असेल तर ती थेट संबंधित सरकारी यंत्रणेकडे पोहोचविण्याचे कामही या अ‍ॅपद्वारे केले जाणार असल्याचे शाह यांनी सांगितले. या अ‍ॅपमुळे ‘राइट टू पी’ ही चळवळ अधिक सक्षम होण्यास मदत होईल, अशी अपेक्षा सुप्रिया सोनार यांनी व्यक्त केली. तसेच यामुळे यंत्रणांवरही वचक ठेवणे शक्य होईल असेही सोनार म्हणाल्या.

आवाजासाठीही अ‍ॅप

आवाजासाठीही अ‍ॅप असणार आहे. शहरातील ध्वनिप्रदूषणाबद्दल तक्रार करण्यासाठी सध्या आवाज फाऊंडेशनची यंत्रणात कार्यरत आहे. मात्र जर अ‍ॅप तयार झाले तर जास्तीत जास्त लोक यात सहभागी होऊ शकतील, अशी अपेक्षा ‘आवाज फाऊंडेशन’च्या सुमायरा अब्दुलअली यांनी व्यक्त केली. या अ‍ॅपमध्ये भूस्थान निश्चिती प्रणाली वापरली जाणार असल्यामुळे नेमका आवाज कोणत्या भागात आहे, किती वाजता आहे आणि किती प्रमाणात आहे याचा सत्य तपशील आमच्यापर्यंत येईल आणि मग तो यंत्रणांपर्यंत पोहोचवणे शक्य होईल, असेही सुमायरा यांनी स्पष्ट केले.

बेस्ट ही सार्वजनिक वाहतूक सेवा आहे. त्या गाडय़ांना प्राधान्य दिल्यास शहरात रस्त्यांवर उतरणाऱ्या खासगी गाडय़ांचे प्रमाण कमी होईल. बेस्ट उपक्रमाने काही रस्त्यांवर राखीव मार्गिकांचे प्रस्ताव दिले आहेत. लिंक रोड आणि पश्चिम द्रुतगती महामार्ग या रस्त्यांवरील वाहतुकीचा अभ्यास करून, मेट्रो प्रकल्पांचे बांधकाम चालू झाल्यानंतर पाहणी करून मगच या राखीव मार्गिकांबाबत निर्णय घेतला जाईल.

– मिलिंद भारंबे, उपायुक्त (वाहतूक पोलीस प्रमुख)