फी भरण्यासाठी सतत शिक्षकाने लावलेल्या तगाद्याला कंटाळून १४ वर्षीय विद्यार्थाने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. वसईमध्ये वालीव पोलिस स्टेशनच्या हद्दीत हा धक्कादायक प्रकार घडला आहे. आत्महत्या केलेल्या मुलाचे नाव अजय दुबे असे आहे. तो आदर्श चाळीत आई-बाबा आणि लहान भावासह राहत होता. वडिल टॅक्सी चालक आहेत. पोलिसांनी अपघाती मृत्यूची नोंद केली आहे पण सुसाईड नोटमुळे शाळेत विचारपुस सुरु आहे.

वसईतील गोलाई नाका या परिसरातील एका शाळेत हा विद्यार्थी शिकत होता. वडील रिक्षा चालवण्याचं काम करतात. घरची आर्थिक परिस्थिती नाजूक असल्याने या विद्यार्थ्याला फी भरणे शक्य होत नव्हते. शाळेची फी भरण्यासाठी शिक्षकांकाकडून सतत विचारणा होत होती. एका शिक्षकाने भर वर्गात फी कधी भरणार?, असं विचारलं. जर फी भरली नाही तर परीक्षेला बसू देणार नाही, असे सांगितले. शाळेकडून सतत फीसंदर्भात विचारणा होत होती. शाळेची फी लवकर भरू, असं आश्वासन मी माझ्या मुलाला दिलं होतं, असं त्याच्या वडिलाने पोलिसांना सांगितले.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आठवीमध्ये शिकणारा अजय अभ्यासात हुशार होता. शुक्रवारी शिक्षकाने लवकरात लवकर फी भर, अन्यथा परिक्षेत बसू देणार नाही असे अजयला सांगितले. त्यानंतर त्याने ही गोष्ट वडिलांच्या कानावर घातली. वडिल शिक्षकाला भेटण्यासाठी शाळेत गेले, मात्र शिक्षक भेटले नाहीत. सोमवारी अजय शाळेत जाऊन दुपारी एक वाजता घरी परतला. वडिल कामानिमित्त घराबाहेर गेल्यानंतर सायंकाळी सात वाजता आजयने गळफास घेऊन आत्महत्या केली.