मागच्या काही दिवसांमध्ये रेल्वेच्या अपघातांचे सत्र सुरुच आहे. मध्य रेल्वेच्या मार्गावर कधी दरड कोसळली म्हणून तर कधी रेल्वे रुळाला तडे गेले म्हणून प्रवाशांचा खोळंबा होतो. असाच एक अपघात होता होता वाचला. मुंबई-पुणे मार्गावर रोज धावणाऱ्या इंटरसिटी एक्सप्रेसचा अपघात आज थोडक्यात टळला. रेल्वे नेहमीप्रमाणे या मार्गावरुन जात असताना रेल्वेच्या रुळाला तडा गेल्याचे एका रेल्वे कर्मचाऱ्याच्या लक्षात आले. हा प्रकार ठाकूरवाडी ते मंकी हिलच्या दरम्यान घडला होता. या ठिकाणी दोन रुळाच्या मध्ये सुमारे तीन ते चार इंचाचे अंतर पडले होते. यावरुन रेल्वे गेली असती तर मोठा अपघात होण्याची शक्यता होती. या प्रकारामुळे मुंबईहून पुण्याला जाणाऱ्या दोन एक्सप्रेस उशीराने धावत आहेत. इंटरसिटी एक्सप्रेस १ तास उशीराने तर डेक्कन एक्सप्रेस १५ मिनिटे उशीराने धावत आहे.

आज सकाळी इंटरसिटी एक्सप्रेस खंडाळा घाटातून जात असताना गॅप पेट्रोलिंग करून घरी जाणाऱ्या गँगमन सुनील कुमार यांना डाऊन लाईनवरील रेल्वे रुळाला तडे गेल्याचे त्यांना दिसले. तितक्यात मुंबईहून पुण्याला येणारी इंटरसिटी एक्सप्रेस तिथे पोहचली. मात्र सुनील कुमार यांच्या सतर्कतेमुळे ती रेल्वे जागीच थांबवण्यात आली. गँगमनच्या सतर्कतेमुळे मोठी दुर्घटना टळली. इंटरसिटी एक्स्प्रेस मुबईहून सकाळी ६.४० वाजता निघते आणि ९.५० ला पुणे स्टेशनला पोहोचते.

सुनिल कुमार यांनी तडा गेल्याचे लक्षात आल्यानंतर या मार्गावरून जाणाऱ्या इंटरसिटी एक्सप्रेसच्या चालकाला इशारा करून गाडी थांबविण्यास सांगितले. चालकाने वेळीच गाडी थांबविल्याने मोठा अपघात टळला. त्यानंतर थोड्याच वेळात रेल्वेच्या इंजिनिरिंग स्टाफने येऊन पाहणी करून तात्पुरती दुरुस्ती करून इंटरसिटी पुण्याकडे रवाना केली. मात्र याचा परिणाम एकूणच मध्य रेल्वेच्या वाहतुकीवर झाला. इंटरसिटीनंतर मुंबईहून पुण्याला जाणारी डेक्कन एक्सप्रेस आणि इतर लोकलही उशीराने धावत होत्या.