चाचणी यशस्वी; प्रवासवेळेत ४० मिनिटांची बचत

मुंबई : मुंबई ते पुणे मार्गावरील ‘डेक्कन क्वीन’पाठोपाठ आता इंटरसिटी एक्स्प्रेसलाही पुश-पूल पद्धतीने दोन्ही बाजूंना इंजिन जोडून शुक्रवारी चाचणी घेण्यात आली. ही चाचणी यशस्वी झाल्याने गाडीचा वेग वाढून प्रवास वेळ ४० मिनिटांनी कमी होणार आहे.

दररोज हजारो जण पुणे-मुंबई-पुणे असा प्रवास करतात. या मार्गावरील प्रवाशांचा प्रवास सुरक्षित व वेगवान घडवण्यासाठी रेल्वेकडून प्रयत्न केले जात आहेत. सध्या कसारा, लोणावळा घाट क्षेत्रातून जाताना एक्स्प्रेस गाडय़ांच्या दोन्ही बाजूंना लोणावळा स्थानकापर्यंत तात्पुरते इंजिन जोडले जाते. मात्र आता ‘एलएचबी’ प्रकारातील गाडय़ांच्या दोन्ही बाजूंना पुश अ‍ॅण्ड पुल पद्धतीने कायमचे इंजिन जोडून वेग वाढवण्याच्या चाचण्या घेण्यात येत आहेत. काही दिवसांपूर्वी ‘डेक्कन क्वीन’साठी पुश अ‍ॅण्ड पुल पद्धतीने चाचणी घेण्यात आली होती. आता याच मार्गावर धावणाऱ्या ‘इंटरसिटी एक्स्प्रेस’साठीही त्याच पद्धतीने शुक्रवारी चाचणी घेण्यात आली.

ही चाचणी यशस्वी झाली असून त्यामुळे या गाडीचाही प्रवास वेळ ४० मिनिटांनी कमी झाला आहे, अशी माहिती मध्य रेल्वे मुख्य जनसंपर्क अधिकारी सुनील उदासी यांनी दिली. या चाचणीनंतर एक अंतिम चाचणी होणार आहे. तीदेखील यशस्वी झाल्यानंतर गाडीच्या वेळेत थोडा बदल करून ती चालवण्यात येईल, असे उदासी म्हणाले.

‘इंटरसिटी एक्स्प्रेस’ ही ‘एलएचबी’ प्रकारातील आहे. मुंबई ते पुणे मार्गावरील डेक्कन क्वीन एक्स्प्रेसचे डबे हे ’एलएचबी’ प्रकारातील नाही. त्यामुळे ‘एलएचबी’ असलेली राजधानी एक्स्प्रेस घेऊन डेक्कन क्वीनच्या वेळेत त्याची नुकतीच चाचणी घेण्यात आली होती.