26 January 2020

News Flash

मुंबई-पुणे रेल्वेसेवा शुक्रवारपासून पूर्ववत

मुंबई ते पुणे रेल्वे सेवा कधी पूर्ववत होईल याकडे सर्वाचे लक्ष लागले आहे. 

कर्जत ते लोणावळा भागात दुरुस्तीच्या कामांना वेग

मुंबई : कर्जत ते लोणावळा भागांत सातत्याने दरड कोसळण्याच्या घटनांमुळे गेले दहा दिवस बंद असलेला मुंबई ते पुणे रेल्वे मार्ग शुक्रवार १६ ऑगस्टपासून पूर्ववत होण्याची शक्यता आहे. मध्य रेल्वेने दरड कोसळलेल्या भागात मोठय़ा प्रमाणात हाती घेतलेल्या कामांना गती दिली जात आहे.

मध्य रेल्वे अधिकाऱ्यांनी मंगळवारी त्याचा आढावा घेतला. त्यानंतर १६ ऑगस्टपासून या मार्गावरील रेल्वे सेवा पूर्ववत करण्याचा प्रयत्न असल्याचे सांगण्यात आले.

जुलैच्या सुरुवातीला आणि अखेरीस पडलेल्या मुसळधार पावसामुळे कर्जत ते लोणावळा भागात नागनाथसह आणखी दोन भागांत रेल्वेच्या मालमत्तेची मोठी हानी झाली. रुळांवर पाणी साचण्याबरोबरच दरड कोसळण्याच्या घटना घडल्या. यात रुळांखालील खडी वाहून गेली, तर सिग्नलचीही हानी झाली. त्यामुळे मध्य रेल्वेने विविध कामांसाठी दहा दिवसांपूर्वी मुंबई ते पुणे रेल्वे सेवा पूर्णपणे बंद ठेवली. परिणामी प्रवाशांचे हाल झाले आणि त्यांना एसटी व खासगी ट्रॅव्हल्सचा आधार घ्यावा लागला. त्यामुळे मुंबई ते पुणे रेल्वे सेवा कधी पूर्ववत होईल याकडे सर्वाचे लक्ष लागले आहे.

मंगळवारी दरड कोसळलेल्या कर्जत ते लोणावळा भागांचा मध्य रेल्वे महाव्यवस्थापक ए. के. गुप्ता आणि अन्य वरिष्ठ  अधिकाऱ्यांनी आढावा घेतला. दोन दिवसांपूर्वीही याच भागात होत असलेल्या कामांची माहिती घेतली होती. दरड कोसळत असलेल्या ठिकाणी रेल्वेकडून संरक्षक भिंत, जाळ्या यासह अनेक उपाययोजना केल्या जात आहेत. तर सिग्नल यंत्रणा, रूळ आणि ओव्हरहेड वायरचीही कामे केली जात आहेत. ही कामे मोठय़ा प्रमाणात हाती घेताना त्याला गती दिली जात असून १६ ऑगस्टपासून मुंबई ते पुणे रेल्वे सेवा पूर्ववत करण्याचा प्रयत्न केला जाणार असल्याचे मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी सुनील उदासी यांनी सांगितले.

* कर्जत ते लोणावळा घाट क्षेत्रातून रेल्वे गाडय़ा जाताना वेगमर्यादा असते. मात्र गेल्या काही दिवसांत दरड कोसळण्याच्या घटनांमुळे गाडय़ांच्या वेगावर आणखी मर्यादा येणार आहे.

* रेल्वेकडून पावसाळापूर्व कामे मोठय़ा प्रमाणात केली जातात. यंदा पाऊस मोठय़ा प्रमाणात पडल्यामुळे दरड कोसळण्याच्या घटनांसह अन्य समस्यांचा सामना मध्य रेल्वेला करावा लागला. ही कामे करूनही त्याचा फायदा झाला नाही. त्यामुळे मुंबई ते पुणे रेल्वे सेवा पूर्ववत करण्यासाठी रेल्वे मंत्रालयाकडूनही सूचना करण्यात आल्या आहेत.

* १६ ऑगस्टपासून या मार्गावरील रेल्वे सेवा पूर्ववत करण्याचा प्रयत्न जरी असला तरी मुसळधार पाऊस झाल्यास पुन्हा तीच परिस्थिती उद्भवण्याची भीतीही व्यक्त केली जात आहे.

First Published on August 14, 2019 5:05 am

Web Title: mumbai pune railways service will start from friday zws 70
Next Stories
1 अलिबाग किनाऱ्यावरील बेकायदा बंगल्यांना संरक्षण का?
2 ‘मेट्रो ३’च्या भुयारीकरणाचा सतरावा टप्पा पूर्ण
3 वाहन बाजारातील मंदी वितरकांच्या मुळावर
Just Now!
X