नव्या मार्गिकेचे २२ टक्के काम पूर्ण

मुंबई: मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील प्रवास आणखी सुसाट आणि सुरक्षित करण्यासाठी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळा (एमएमआरडीए)ने खोपोली ते कुसगाव दरम्यान नवीन मार्गिकेच्या बांधणीचे काम हाती घेतले आहे. २० ते २५ मिनिटांची बचत करणाऱ्या या नव्या मार्गिकेवरून प्रवास करण्यासाठी  वाहनचालकांना थोडी प्रतीक्षा करावी लागेल.

करोनामुळे या प्रकल्पाचे काम मंदावले होते. मात्र या कामाला वेग देण्यात आला असून आतापर्यंत २२ टक्के काम पूर्ण करण्यात आले आहे.

हा प्रकल्प आता डिसेंबर २०२२ ऐवजी जून २०२३ मध्ये पूर्ण होणार आहे. ६६९५.३७ कोटी रुपये खर्चाच्या या कामाला फेब्रुवारी २०१९ मध्ये सुरवात झाली आहे.

द्रुतगती मार्गामुळे मुंबई ते पुणे अंतर कमी झाले आहे. तर हे अंतर आणखी कमी करत प्रवास अधिक वेगात करण्यासाठी एमएसआरडीसीने खोपोली ते कुसगाव अशी १९.८० किमीच्या नवीन मार्गिकेचे काम हाती घेतले. फेब्रुवारी २०१९ मध्ये या कामाला दोन टप्प्यात सुरुवात करण्यात आली.

या प्रकल्पाअंतर्गत खोपोली ते कुसगाव दरम्यानचा मार्ग आता सहाऐवजी आठ पदरी होणार आहे. तर या नव्या मार्गात दोन बोगदेही बांधण्यात येत आहेत. यातील एक बोगदा १ ७५ किमीचा तर दुसरा ८.९२ किमी लांबीचा आहे. २१.४२रुंदीचे बोगदे असून देशातील सर्वाधिक रुंदीचे बोगदे असतील असा दावा केला जात आहे. ६६९५.३७ कोटी रुपये खर्च करत बांधण्यात येत असलेल्या प्रकल्पामुळे प्रवासाच्या वेळेत २० ते २५ मिनिटांची बचत होईल.

तर प्रवास अधिक सुरक्षित होणार आहे. कारण नव्या मार्गिकेत घाट भाग कमी होणार असल्याने दरडी कोसळण्याची भीती दूर होणार आहे.

स्थिती काय?

आतापर्यंत एकूण प्रकल्पाचे काम २२ टक्के पूर्ण झाले. तर उर्वरित कामाला वेग देत पहिला टप्पा मार्च २०२३ मध्ये तर दुसरा टप्पा एप्रिल २०२३ मध्ये पूर्ण करण्यात येईल. त्यानंतर जून २०२३ मध्ये ही नवीन मार्गिका वाहतूक सेवेत दाखल होईल आणि प्रवास आणखी वेगात होईल असे एका अधिकाऱ्याने सांगितले आहे.

विलंब का?

फेब्रुवारी २०१९ मध्ये दोन टप्प्यात  प्रकल्पाच्या कामाला सुरुवात झाली आणि वर्षभरात देशात करोनाचा शिरकाव झाला. टाळेबंदी लागल्याने काम मंदावले. मजुरांची कमतरता निर्माण झाली. वर्षभर ही परिस्थिती होती. त्याचा मोठा फटका कामाला बसला. त्यामुळेच डिसेंबर २०२२ चा मुहूर्त आता जून २०२३ वर गेल्याची माहिती एमएसआरडीसीमधील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली आहे.

करोना व टाळेबंदीचा परिणाम तसा आमच्या सगळ्याच प्रकल्पांवर झाला. या प्रकल्पातही मजुरांची मोठी कमतरता भासली. त्याच वेळी या नव्या मार्गिकेत मोठय़ा प्रमाणावर वेल्डिंगची कामे असून यासाठी खूपच कृत्रिम प्राणवायू (ऑक्सिजन) लागतो. मात्र करोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात प्राणवायूची मोठी टंचाई असल्याने तो उपलब्ध होऊ शकला नाही. याचाही फटका कामाला बसला. आता मात्र आम्ही कामाला वेग दिला असून जून २०२३ मध्ये प्रकल्प वाहतूक सेवेत दाखल होईल. त्यामुळे २० ते २५ मिनिटांनी प्रवासाचा कालावधी कमी होईल. 

– अनिलकुमार गायकवाड, सहव्यवस्थापकीय संचालक, एमएसआरडीसी