मुंबई ते पुणे मार्गावरील रेल्वेसेवा अद्यापही रुळावर आलेली नाही. हा मार्ग पूर्ववत करण्यासाठी वेळ लागत असून १५ ऑगस्टनंतरच रेल्वे सेवा पूर्ववत होईल, अशी माहिती मध्य रेल्वेने दिली आहे. यामुळे अनेक प्रवाशांची गैरसोय झाली आहे. ही गैरसोय टाळण्यासाठी एसटी महामंडळाने पुढाकार घेतला असून मुंबई-पुणे मार्गावर जादा एसटी बसेस सोडण्याचा निर्णय घेतला आहे.

परिवहन मंत्री आणि एसटी महामंडळाचे अध्यक्ष दिवाकर रावते यांनी यासंबंधी निर्देश दिले आहेत. दिवाकर रावते यांच्या निर्देशानंतर जादा बस फेऱ्या सुरु करण्यात आल्या आहेत. शिवनेरीच्याही फेऱ्यांमध्ये वाढ करण्यात आली असून ३२ अतिरिक्त फेऱ्या सुरु करण्यात आल्या आहेत.

जुलै महिन्यात पडलेल्या पावसामुळे मध्य रेल्वेवरील कर्जत-लोणावळादरम्यान घाट क्षेत्रात दरड कोसळण्याच्या घटना मोठय़ा प्रमाणात घडल्या होत्या. त्यामुळे या स्थानकांदरम्यान २६ जुलै ते ९ ऑगस्टपर्यंत विशेष ब्लॉक घेऊन कामे करण्यासाठी नियोजन केले; परंतु २ ऑगस्टपासून पुन्हा पडलेल्या मुसळधार पावसामुळे कर्जत ते लोणावळा भागांत तीन ठिकाणी दरड कोसळणे, पाणी साचून मोठा फटका बसला आणि ३ ऑगस्टपासून मुंबई ते पुणे मार्ग पूर्णपणे बंदच ठेवावा लागला.

गेल्या दहा महिन्यांत याच भागांत १,८०० मिमीपेक्षाही जास्त पाऊस पडला आहे व सातत्याने अधूनमधूनही पाऊस पडतच आहे. त्यामुळे दरड बाजूला करून येथे विविध प्रकारची कामे केली जात आहेत.

कर्जत ते लोणावळा भागांत २०० ते २५० कर्मचारी रुळदुरुस्ती तसेच दरड कोसळलेल्या भागांत विविध कामे करीत आहेत. येथील नागनाथ भागांत दरड कोसळण्याचे प्रमाण अधिक आहे. सातत्याने पडत असलेला पाऊस यामुळे कामांत अडथळा येत असून मुंबई ते पुणे रेल्वे सेवा १६ ऑगस्टपासून पूर्ववत करण्याचे प्रयत्न असल्याचे मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी सुनील उदासी यांनी सांगितलं आहे.