रेसकोर्स बाहेर नेता येऊ शकतो. मात्र, सामान्य मुंबईकरांच्या आनंदासाठी जागतिक दर्जाचे उद्यान व्हायलाच हवे, असे सांगत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुंबईतील रेसकोर्सच्या जागेवर उद्यान उभारण्याबाबत शिवसेना ठाम असल्याचे शुक्रवारी स्पष्ट केले. 
कोणतेही राजकारण न करता मुंबईकरांसह देश-विदेशातील पर्यटकांसाठी जागतिक दर्जाचे उद्यान उभारण्यासाठी मुंबईतील रेसकोर्सची जागा देण्याची मागणी मुख्यमंत्र्यांकडे करणार असल्याचे त्यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. रेसकोर्सच्या जागेवर उभारता येऊ शकेल, अशा संभाव्य उद्यानाचे संकल्पनाचित्रही उद्धव ठाकरे यांनी प्रसिद्ध केले. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडे भेटीसाठी वेळ मागितला आहे. त्यांनी बोलावल्यावर आज किंवा उद्या कधीही त्यांच्याकडे जाऊन त्यांना संकल्पना चित्र दाखविणार असून, पुढील आठवड्यात मुंबई महापालिकेकडून यासंबंधीचा प्रस्ताव राज्य सरकारला पाठविण्यात येईल, असे ते म्हणाले. उद्यान विकसित करण्यासाठी कोणत्याही आरक्षणांमध्ये बदल करण्यात येणार नसून, त्या जागेवर कोणतेही मोठे बांधकाम करणार नसल्याचेही त्यांनी सांगितले.